Homeताज्या बातम्या

सरसकट कर्जमाफीसाठी पारनेरमध्ये ‘जनआक्रोश मोर्चा’; खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली बैलगाड्या आणि ट्रॅक्टरसह शेतकरी रस्त्यावर

पारनेर : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत, पीकविमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच शेतीसंबंधित विवि

पारनेरमध्ये विशेष मार्गदर्शन शिबीर उत्साहात; विविध शासकीय योजनांची माहिती, दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खा. नीलेश लंके यांची प्रकृती बिघडली
सरसकट कर्जमाफीसाठी मंगळवारी पारनेर तहसीलवर मोर्चाखा. लंके यांच्या उपस्थितीत बैठक ; शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग

पारनेर : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत, पीकविमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच शेतीसंबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली.
या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भूमिपुत्र शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवबा संघटना, संभाजी ब्रिगेड आणि भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
खा. नीलेश लंके यांच्या संपर्क कार्यालयापासून मोर्चास सुरुवात झाली. तालुक्यातील विविध गावांमधून आलेले शेतकरी, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. बैलगाड्या, ट्रॅक्टर तसेच शेळ्या-मेंढ्यांसह अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत शासनाचे लक्ष वेधून घेतले. शेतकरी हिताच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर आयोजित सभेत खा. लंके यांनी शेतकऱ्यांसमोरील गंभीर परिस्थितीवर भाष्य केले. वाढता उत्पादन खर्च, शेतीमालाला मिळत असलेले अपुरे दर, नैसर्गिक आपत्तींचे संकट, कर्जबाजारीपणा आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
सभेत विविध पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधींनीही आपली मते मांडली. शेतकरी प्रश्नांवर राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. शेतमालाला हमीभाव, सरसकट कर्जमाफी, शेतीपंपांना नियमित वीजपुरवठा, पीकविमा योजनेतील त्रुटी दूर करणे, अतिवृष्टी व दुष्काळग्रस्तांना तत्काळ मदत देणे यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेत लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यात आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या मोर्चात विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, महिला कार्यकर्त्या तसेच तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

COMMENTS