Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या मागणीला वेग

खा. अशोकराव चव्हाणांची पोलीस महासंचालकांशी महत्त्वपूर्ण भेट नांदेड : नांदेड शहराच्या वाढत्या विस्ताराच्या पार्श्‍वभूमीवर स्वतंत्र पोलीस आयुक्त

नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती!; खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
जिल्ह्यात आठवडाभर पुरेल एवढाच गॅसचा साठा!व्यावसायिक गॅसचा तुटवडा; खानावळी, हॉटेलचालक  संकटात, विद्यार्थ्यांच्या जेवणावर प्रश्नचिन्ह
उर्सात बनावट नोटा चालविण्याचा प्रयत्न फसला; 19 हजार 500 रुपयांच्या नोटा जप्त

खा. अशोकराव चव्हाणांची पोलीस महासंचालकांशी महत्त्वपूर्ण भेट

नांदेड : नांदेड शहराच्या वाढत्या विस्ताराच्या पार्श्‍वभूमीवर स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या मागणीला पुन्हा एकदा वेग आला असून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी मुंबई येथे राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली.
नांदेड शहरातील वाढती लोकसंख्या, शहरी विस्तार आणि कायदा-सुव्यवस्थेच्या वाढत्या गरजा लक्षात घेता येथे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करणे अत्यावश्यक असल्याचे खा. चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले. आयुक्तालय स्थापन झाल्यास शहरातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम होऊन नागरिकांना अधिक प्रभावी व तत्पर सेवा देता येईल, असेही त्यांनी सांगितले. या भेटीदरम्यान नांदेडमध्ये ‘सुरक्षित शहर’ प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. या प्रकल्पांतर्गत शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि संवेदनशील ठिकाणी अत्याधुनिक दृश्य नोंद यंत्रणा (सीसीटीव्ही कॅमेरे) उभारून नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या ‘विकसित नांदेडचा संकल्पनामा’ मध्येही या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे आश्‍वासन देण्यात आले असल्याची आठवण यावेळी करून देण्यात आली. या बैठकीला भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण उपस्थित होत्या. त्यांनी सुरक्षित शहर प्रकल्पाचा विस्तार करत तालुका मुख्यालयांच्या शहरांचाही समावेश करण्याची सूचना मांडली. विशेषतः भोकर, मुदखेड आणि अर्धापूर या शहरांमध्येही हा प्रकल्प राबविण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. बैठकीला पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय)  सुवेझ हक हे देखील उपस्थित होते. नांदेडसाठी पोलीस आयुक्तालय स्थापन करणे आणि सुरक्षित शहर प्रकल्प राबविण्यासंदर्भात शासन स्तरावर पुढील पाठपुरावा करण्यात येईल, असा विश्‍वास खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला.

COMMENTS