देवळाली प्रवरा : अहिल्यानगर जिल्ह्यात जून महिन्याच्या अखेरीसही समाधानकारक पाऊस न झाल्याने उन्हाची तीव्रता कायम आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्या

देवळाली प्रवरा : अहिल्यानगर जिल्ह्यात जून महिन्याच्या अखेरीसही समाधानकारक पाऊस न झाल्याने उन्हाची तीव्रता कायम आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळ सत्रात भरविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्तसचिव राजेंद्र निमसे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात २१ जून २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील शाळांचे शैक्षणिक सत्र १५ जूनपासून नियमित सुरू झाले असले तरी अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातही पावसाची शक्यता कमी असल्याने उष्णतेचा प्रकोप कायम आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई, पत्र्यांच्या शाळा इमारतींमध्ये वाढणारे तापमान आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे.
सध्या शाळांची वेळ सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ अशी असून ती बदलून सकाळी ७.३० ते ११.३० अशी करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारांचा वापर करून संबंधित विभागांना सकाळ सत्राबाबत निर्देश देण्यात यावेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या विषयाची माहिती विभागीय आयुक्त, नाशिक यांनाही देण्यात आली असून राज्यातील नांदेड, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार सकाळ सत्रातील शाळा भरविण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, राज्य संघटक बाळासाहेब कदम, संघाचे जिल्हाध्यक्ष शरद वांढेकर, ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप चक्रनारायण, सुनील शिंदे विलास लवांडे, सुधीर बोऱ्हाडे, सुरेश नवले ,सुधीर रणदिवे, दत्तात्रय परहर, रामप्रसाद आव्हाड ,शिवाजी ढाकणे, भारत शिरसाठ, रज्जाक सय्यद नंदू गायकवाड,अनिता उदबत्ते, संगीता घोडके ,संगीता निगळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

COMMENTS