अकोले : अकोले तालुक्यातील कोतुळ येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमध्ये झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी संचालक व संबंधित कर्
अकोले : अकोले तालुक्यातील कोतुळ येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमध्ये झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी संचालक व संबंधित कर्मचाऱ्यांकडून एकूण १३ लाख ६ हजार ३०० रुपये आठ टक्के सरळ व्याजासह वसूल करण्याचे आदेश सहाय्यक निबंधक अमोल वाघमारे यांनी दिले आहेत. तसेच संबंधित रकमेची वसुली झाली अथवा नाही, याबाबतचा अहवाल पंधरा दिवसांत सादर करण्याचे निर्देशही आदेशात देण्यात आले आहेत.
प्राधिकृत चौकशी अधिकारी तथा सेवानिवृत्त विशेष लेखापरीक्षक (वर्ग-२) बाबासाहेब पगारे यांनी केलेल्या चौकशीत आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये संस्थेमध्ये १२ लाख ५ हजार ५०० रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या गैरव्यवहारासाठी तत्कालीन सचिव दादाभाऊ साबळे, लिपिक रोहिदास जगताप आणि लिपिक दीपक परशुरामी यांना जबाबदार धरत त्यांच्याकडून प्रत्येकी ४ लाख १ हजार ८३३ रुपये अशी एकूण १२ लाख ५ हजार ५०० रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय चौकशी खर्चापोटी प्रत्येकी ५ हजार ६०० रुपये याप्रमाणे संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष विशाल गोडे, उपाध्यक्ष निवृत्ती पोखरकर, संचालक मनोज देशमुख, सयाजी देशमुख, रघुनाथ जाधव, गेनू गोडे, संदीप लेंडे, बाळासाहेब लेंभे, भागा शेळके, चंदन वायळ, भीमराव साळवे, बाळासाहेब बेळे, उषा गोडे, सुनंदा कांबळे, चंदू पवार तसेच सचिव दादाभाऊ साबळे, लिपिक रोहिदास जगताप आणि लिपिक दीपक परशुरामी यांच्याकडून एकूण १ लाख ८०० रुपये वसूल करण्याचेही आदेश आहेत.
ही रक्कम २५ सप्टेंबर २०२५ पासून आठ टक्के सरळ व्याजासह वसूल करण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. गैरव्यवहाराची रक्कम १२ लाख ५ हजार ५०० रुपये आणि चौकशी खर्चाची १ लाख ८०० रुपये अशी एकूण १३ लाख ६ हजार ३०० रुपये संबंधितांकडून वसूल करण्यात यावेत. या आदेशाची अंमलबजावणी करून वसुलीचा अहवाल पंधरा दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश सहाय्यक निबंधकांनी दिले आहेत.

COMMENTS