छत्रपती संभाजीनगर - शेतकरी वारकरी आहेत तर वारकरी शेतकरी आहेत. शेतकरी आणि वारकरी यांना वेगळे करताच येत नाही. ते दोघेही एकमेकांच्या भूमिकेत वावरत आ

छत्रपती संभाजीनगर – शेतकरी वारकरी आहेत तर वारकरी शेतकरी आहेत. शेतकरी आणि वारकरी यांना वेगळे करताच येत नाही. ते दोघेही एकमेकांच्या भूमिकेत वावरत आहेत. त्यामुळे संत आणि शेतकरी एकरूपच असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध लोककवी, संत साहित्याचे अभ्यासक प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले.
माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे मित्र मंडळाच्या वतीने शेतकरी नेते व माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांची शिवसेना शेतकरी परिषदेच्या राज्यप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजि. बळीराम किन्हाळकर होते. व्यासपीठावर रणजित ढेपे, शिवाजी पा. हिवाळे, दत्ता पवार, ॲड. रमेश वाकडे, ॲड. पंडित आनेराव यांची उपस्थिती होती.
शेतकरी संघटनेच्या लोकचळवळीने संतांच्या विचारातला शेतकरी क्रांतिकारी केला. शेतकऱ्यांना लढायला प्रवृत्त करण्याचे काम शंकर अण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वाने केले. महाविद्यालयीन काळात आमचे चित्रपटांचे हिरो नव्हते, आमचे हिरो शेतकरी संघटनेचे नेते, कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांच्या चाळीस वर्षांची कारकीर्द निश्चितच नव्या पिढीला मार्गदर्शक ठरणारी आहे, असे गौरव उद्गारही प्रा. भालेराव यांनी काढले. संतांच्या साहित्यात आपल्याला सर्वत्र शेतकरी पाहायला मिळतो. शेतकरीही आपल्या मुखातून संतांचे विचार गात राहतो. शेतकऱ्यांचा लोकनायक विठोबाही त्यांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी उभा असतो, हे आपणास संतांच्या वाङ्मयात अनुभवायला मिळते, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र नैसर्गिक संपत्तीने सधन असतानाही शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मोठे आहे. ते दूर करण्यासाठी शासन स्तरावर नियोजन महत्त्वाचे आहे, हे सांगतानाच माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी आपल्या कारकीर्दीचा चाळीस वर्षांचा अनुभव सत्काराला उत्तर देताना सांगितला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सत्यपाल कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन तम्मेवार यांनी केले तर आभार सतीश निकम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल फंड, नामदेव कांबळे, वैजनाथ वाघमारे यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS