नवी दिल्ली - आजच्या झटपट माहितीच्या आणि आकर्षक चित्रफितींच्या युगात जेन झी तरुणांनी यशासाठी शॉर्टकटचा मार्ग स्वीकारू नये, तर संघर्षातून शिकत स्वत

नवी दिल्ली – आजच्या झटपट माहितीच्या आणि आकर्षक चित्रफितींच्या युगात जेन झी तरुणांनी यशासाठी शॉर्टकटचा मार्ग स्वीकारू नये, तर संघर्षातून शिकत स्वतःची वाट निर्माण करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
रामनाथ कोविंद यांच्या “ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक : माय लाइफ, माय स्ट्रगल्स” या आत्मचरित्राचे बुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. याप्रसंगी मोदी यांनी तरुण पिढीला आत्मचरित्रे वाचण्याचे तसेच इतरांच्या आयुष्यातील संघर्ष आणि अनुभवातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज चित्रफितींच्या माध्यमातून काही क्षणांत मोठी माहिती मिळते. सोशल मीडियावरील प्रभावक तरुणांना अनेकदा वेगवेगळ्या दिशेने आकर्षित करतात. मात्र, अशा काळातही रेल्वे स्थानकांवर दिला जाणारा “शॉर्टकटचा मार्ग स्वीकारू नका” हा संदेश लक्षात ठेवण्याची गरज आहे. आयुष्यात खरे यश मिळवायचे असेल तर सातत्य, परिश्रम आणि संघर्षाला पर्याय नाही. रामनाथ कोविंद यांचा जीवनप्रवास हा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा देणारा आहे. दृढ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर सामान्य कुटुंबातून आलेली व्यक्ती देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचू शकते, हे त्यांच्या प्रवासातून स्पष्ट होते, असे मोदी यांनी सांगितले.
कोविंद यांचे आत्मचरित्र भारतीय लोकशाहीच्या प्रवासाचा महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल. नव्या पिढीला या पुस्तकातून केवळ एका व्यक्तीची जीवनकाहाणी समजणार नाही, तर त्या काळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा अनुभवही घेता येईल, असे मोदी यांनी नमूद केले. राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही कोविंद सार्वजनिक जीवनापासून दूर गेले नाहीत. “एक देश, एक निवडणूक” या संकल्पनेच्या अनुषंगाने ते काम करत असल्याचा उल्लेखही मोदी यांनी केला.
पंतप्रधान मोदी यांनी कोविंद यांच्या आत्मचरित्राच्या नावाचेही कौतुक केले. कोविंद यांचा संघर्ष वैयक्तिक असली तरी त्यांच्या यशाचा संबंध भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्याशी आहे. देशातील सामान्य नागरिकाला सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळते, ही भारतीय लोकशाहीची मोठी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. आत्मचरित्रे वाचल्यामुळे एखाद्या व्यक्तीने प्रत्यक्ष अनुभवलेला काळ समजून घेण्याची संधी मिळते. त्यामुळे तरुणांनी अशा पुस्तकांचे वाचन करून संघर्ष, अपयश आणि यशाच्या अनुभवातून शिकले पाहिजे, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.
“गावाने मला आपुलकी शिकवली”
रामनाथ कोविंद यांनी आपल्या बालपणातील आठवणींना उजाळा देताना आपण उत्तर प्रदेशातील कानपूर देहात जिल्ह्यातील गावातून आल्याचे सांगितले. गावातील सामान्य माणसांकडून आपुलकी, प्रेम आणि माणुसकी शिकल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्या घराच्या छतातून पावसाचे पाणी गळत असे आणि पाऊस थांबेपर्यंत कुटुंबाला त्याच परिस्थितीत राहावे लागत असे, अशी आठवण कोविंद यांनी सांगितली. आज देशातील कोट्यवधी गरीब कुटुंबांना विविध गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून पक्के घर मिळत आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षित आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

COMMENTS