पुणे - चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्ते दुरावस्था, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे येथील सुमारे २० लघू उद्योजक त्रस्त झाले आहेत. या समस

पुणे – चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्ते दुरावस्था, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे येथील सुमारे २० लघू उद्योजक त्रस्त झाले आहेत. या समस्यांवर तातडीने तोडगा न निघाल्यास कंपन्या राज्याबाहेर किंवा खंडाळा औद्योगिक वसाहतीत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्याचा इशारा उद्योजकांनी दिला आहे. यामुळे सुमारे चार हजार कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून, राज्याच्या महसुलावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
चाकण औद्योगिक वसाहत हे वाहननिर्मिती उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. मात्र, येथील अंतर्गत तसेच प्रमुख रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस खराब होत आहे. रस्त्यांवर मोठे खड्डे असून, पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. त्यातच रस्त्याच्या कडेला अवजड वाहने उभी असल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम उद्योगांच्या कामकाजावर होत आहे. कच्चा माल आणणे, तयार मालाची वाहतूक करणे आणि कामगारांची ये-जा यामध्ये मोठा वेळ खर्च होत असल्याने उत्पादन क्षमतेवर परिणाम होत आहे.
औद्योगिक वसाहतीतील विविध रस्ते आणि सुविधांची जबाबदारी वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांकडे असल्याने समस्येचे निराकरण करताना अडथळे येत आहेत. एमआयडीसी (MIDC), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे उद्योजकांनी सांगितले.
रस्त्यांवरील खड्ड्यांसोबतच अतिक्रमणे, अवजड वाहनांचे अनियंत्रित पार्किंग आणि वारंवार होणारा वीज-पाणीपुरवठा खंडित होण्याचा त्रासही उद्योजकांना सहन करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसतो, ज्यामुळे गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी येतात. तसेच, येथे स्वतंत्र वाहनतळ, सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि देखरेखीची व्यवस्था यांसारख्या आवश्यक सुविधांचीही कमतरता आहे.
उद्योजकांनी प्रशासनाला १५ ते ३० दिवसांची मुदत दिली असून, तोपर्यंत ठोस उपाययोजना न केल्यास स्थलांतराचा निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले आहे.

COMMENTS