नवी दिल्ली : अमेरिकन चलनाच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण कायम असून, शुक्रवारी रुपया 30 पैशांनी कमजोर होत 95.94 या आतापर्यंतच्या सर्वात खालच्या पा

नवी दिल्ली : अमेरिकन चलनाच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण कायम असून, शुक्रवारी रुपया 30 पैशांनी कमजोर होत 95.94 या आतापर्यंतच्या सर्वात खालच्या पातळीवर पोहोचला. यापूर्वी गुरुवारी रुपया 95.64 वर बंद झाला होता. गेल्या काही दिवसांपासून रुपयामध्ये सातत्याने दबाव दिसून येत असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेबाबत चिंता वाढत आहे.
गतवर्षी डिसेंबरमध्ये रुपया प्रथमच 90 च्या पुढे गेला होता. त्यानंतर जागतिक घडामोडी, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि परदेशी गुंतवणूकदारांची माघार यामुळे भारतीय चलनावर अधिक ताण निर्माण झाला आहे. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, जागतिक परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर रुपया आणखी कमजोर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक बाजार अस्थिर झाले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीतून होणार्या तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार अमेरिकन चलनाकडे वळत आहेत. भारताला आवश्यक असलेल्या बहुतांश कच्च्या तेलाची आयात करावी लागते. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढल्याने आयात खर्च वाढत असून, अधिक डॉलरची गरज भासत आहे. त्यामुळे रुपयावर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे. जागतिक स्तरावर अमेरिकन चलनाची ताकद वाढत आहे. त्यामुळे आशियातील अनेक चलने कमजोर होत असून, त्याचा परिणाम रुपयावरही दिसून येत आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात निधी काढून घेत आहेत. यामुळे देशातून डॉलर बाहेर जात असून, रुपयाचे मूल्य घसरत आहे. घाऊक महागाई दर उच्चांकावर पोहोचल्याने चिंता वाढली आहे. इंधन व ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या खर्चाचा परिणाम सर्वसामान्य वस्तूंवर होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार, तेल उत्पादक देशांचे उत्पादन मागील दोन दशकांतील नीचांकी पातळीवर आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव कायम राहिल्यास जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तेलाचे दर दीर्घकाळ उच्च पातळीवर राहू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

COMMENTS