नवी दिल्ली : उष्णतेच्या लाटेने उत्तरेसह महाराष्ट्र राज्य देखील चांगलाच होरपळतांना दिसून येत आहे. मात्र भारतीय हवामान विभागाने यंदा नैऋत्य मान्सू

नवी दिल्ली : उष्णतेच्या लाटेने उत्तरेसह महाराष्ट्र राज्य देखील चांगलाच होरपळतांना दिसून येत आहे. मात्र भारतीय हवामान विभागाने यंदा नैऋत्य मान्सूनचे आगमन नेहमीपेक्षा लवकर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. विभागाच्या अंदाजानुसार, 26 मे रोजी मान्सून केरळ किनारपट्टीवर दाखल होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील 48 तासांत दक्षिण अंदमान समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमान-निकोबार बेट परिसरात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. 16 मेच्या सुमारास मान्सून अंदमान भागात पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर तो वेगाने पुढे सरकत 26 मेपर्यंत केरळात दाखल होईल, असा अंदाज आहे. दक्षिण आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस जोरदार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, माहे आणि दक्षिण कर्नाटकातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ईशान्य भारतात 13 ते 19 मेदरम्यान अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. काही भागांत ताशी 50 ते 100 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे देशातील हवामानात बदल होत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. एकीकडे मान्सूनच्या आगमनाची चिन्हे दिसत असली तरी दुसरीकडे उत्तर-पश्चिम, पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम आहे. राजस्थानातील बारमेर येथे देशातील सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून अनेक भागांत उकाडा वाढला आहे.
6 जूनपर्यंत कोकणच्या किनारपट्ीवर पोहोचणार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 5 जूनपर्यंत मान्सून गोव्यात पोहोचू शकतो. त्यानंतर 6 जूनपर्यंत कोकण किनारपट्टीवर आणि 7 जूनपर्यंत पुणे परिसरात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेले नसल्याने मान्सूनच्या प्रवासात मोठा अडथळा येण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

COMMENTS