मुंबई: नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमाला उपस्थिती लावून केलेल्या वक्तव्य

मुंबई: नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमाला उपस्थिती लावून केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, सरकारी अधिकाऱ्यांनी निष्पक्षतेचे भान राखणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
सोशम मीडियाद्वारे प्रसिद्ध केलेल्या आपल्या अधिकृत भूमिकेत राज ठाकरे यांनी म्हटले की, एखाद्या अधिकाऱ्याला विशिष्ट संघटना किंवा राजकीय विचारसरणीबद्दल जाहीरपणे समर्थन व्यक्त करायचे असेल, तर त्यांनी प्रथम शासकीय सेवेतून बाहेर पडावे आणि मगच त्यात प्रवेश करावा. पोलीस दलातील अधिकाऱ्यांची निष्ठा ही केवळ कायदा आणि कर्तव्याशीच असली पाहिजे. कोणत्याही वैचारिक किंवा राजकीय स्वरूपाच्या कार्यक्रमात सहभागी होताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा प्रशासनाच्या निष्पक्षतेबाबत जनमानसात प्रश्न निर्माण होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी राज ठाकरे यांनी वर्दीतील ‘खाकी’ रंगाचा उल्लेख करत उपरोधिक भाषेत टीका केली. पोलीस दलाची ओळख आणि त्याची तटस्थ प्रतिमा कायम राखणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. याप्रकरणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सवाल विचारले आहेत. अशा घटनांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट व्हावी आणि प्रशासकीय यंत्रणेत कोणत्याही प्रकारची ‘दुहेरी निष्ठा’ स्वीकारली जाणार नाही, याबाबत शासनाने भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. २०१२ मधील एका घटनेचा संदर्भ देत त्यांनी आठवण करून दिली की, त्यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्यावर निष्पक्षतेच्या मुद्द्यावरून कारवाई करण्यात आली होती; त्याच निकषांचा वापर आज केला जाणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांनीही या प्रकरणावर तीव्र आक्षेप घेतला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या संवैधानिक जबाबदाऱ्यांचे भान ठेवून वर्तन करावे. तसेच अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय प्रक्रिया आणि परवानगी घेतली गेली होती का, याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

COMMENTS