बीड : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)च्या वतीने ब

बीड : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)च्या वतीने बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सारथीचे व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील आणि उपव्यवस्थापकीय संचालक सुवर्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 6 व 8 जून 2026 रोजी ही मोहीम पार पडली.
या मोहिमेदरम्यान सारथीच्या सहा पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांनी किल्ला परिसरातून सुमारे 8 किलो प्लास्टिक व इतर कचरा गोळा केला. राजर्षी शाहू महाराजांची जयंती 26 जून रोजी साजरी होत असून, त्यानिमित्त 26 मे ते 25 जून 2026 या कालावधीत विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून 1 ते 7 जून दरम्यान अधिछात्रवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राज्यातील विविध गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. धारूर किल्ल्यावर सकाळी 6 ते 10 या वेळेत पार पडलेल्या मोहिमेत विद्यार्थ्यांनी किल्ला व परिसराची स्वच्छता करत चार गोणी कचरा गोळा केला. यात प्रामुख्याने प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या आणि इतर टाकाऊ वस्तूंचा समावेश होता. संकलित करण्यात आलेला सर्व कचरा धारूर प्रशासनाच्या सहकार्याने योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आला. या मोहिमेचे नेतृत्व गटप्रमुख रामेश्वर झोडगे आणि गटप्रमुख वैशाली घोलप यांनी केले. त्यांच्यासह इतर संशोधक विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली, असे सारथी संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS