Homeताज्या बातम्या

युरियासाठी कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी; एका गोणीसाठी तासन्तास रांगेत उभे राहण्याची वेळ

श्रीगोंदा: खरीप हंगामात युरिया खताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने अखेर प्रशासनाने बफर स्टॉकमधील युरिया विक्रीस परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर

लूटमार करणारी टोळी जेरबंद; पाच आरोपींना अटक, बेलवंडी पोलिसांची धडक कारवाई
मुठेवाडगाव न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ५० गरजू विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटप; इनरव्हील क्लब श्रीरामपूरचा स्तुत्य उपक्रम
नांदेड विभागातील विशेष तिकीट तपासणी मोहिमेत ५४३ प्रकरणे निष्पन्न; ३.८१ लाखांचा महसूल वसूल

श्रीगोंदा: खरीप हंगामात युरिया खताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने अखेर प्रशासनाने बफर स्टॉकमधील युरिया विक्रीस परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर श्रीगोंदा तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांनी खतासाठी मोठी गर्दी केली असून मंगळवारी सकाळपासूनच विविध केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.

पेरणीनंतर पिकांच्या योग्य वाढीसाठी सध्या युरिया खताची अत्यंत आवश्यकता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बाजारात खत उपलब्ध नसल्याने शेतकरी चिंतेत होते. प्रशासनाने बफर स्टॉक खुला केल्यानंतर युरिया मिळण्याची आशा निर्माण झाली असली, तरी मागणीच्या तुलनेत मर्यादित साठा असल्याने एका गोणीसाठीही शेतकऱ्यांना तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे.

तालुक्यात अनेक ठिकाणी पहाटेपासूनच शेतकरी रांगेत उभे असल्याचे दिसून आले. दिवसभर प्रतीक्षा करूनही शेवटी खत मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कृषी सेवा केंद्रांवरील गर्दीमुळे परिसरात वाहनांची वर्दळ वाढून काही ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती.

खरिपाच्या ऐन हंगामात वेळेवर खत मिळणे गरजेचे असून उशिरा खत मिळाल्यास पिकांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पुरेशा प्रमाणात युरियाचा साठा उपलब्ध करून नियमित पुरवठा करावा, अशी मागणी केली जात आहे.

दुसरीकडे, उपलब्ध साठ्यानुसार आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच खताचे वितरण केले जात असल्याचे कृषी सेवा केंद्र चालकांनी सांगितले. मात्र, मागणी प्रचंड आणि साठा अपुरा असल्याने ही गर्दी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

युरियाचा अखंडित पुरवठा झाल्यासच खरिपाचा प्रश्न मार्गी लागेल

बफर स्टॉक खुला केल्याने तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत खत पोहोचण्यासाठी युरियाचा अखंडित आणि पुरेसा पुरवठा होणे गरजेचे आहे. तरच खरीप हंगामातील खताची ही बिकट समस्या पूर्णपणे सुटू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS