केज: तालुक्यातील टाकळी परिसरात तरुणांच्या आपसांतील भांडणातून विलास घुले या निष्पाप तरुणाचा झालेला दुर्दैवी मृत्यू अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक

केज: तालुक्यातील टाकळी परिसरात तरुणांच्या आपसांतील भांडणातून विलास घुले या निष्पाप तरुणाचा झालेला दुर्दैवी मृत्यू अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहे. एका निष्पाप तरुणाला अशा प्रकारे आपला जीव गमवावा लागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून, या प्रकरणातील दोषी आरोपींवर पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
टाकळी येथील या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर खा. बजरंग सोनवणे यांनी मृत विलास घुले यांना श्रद्धांजली अर्पण केली. ईश्वर मृत विलासच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि या अथांग दु:खातून सावरण्याचे बळ घुले परिवाराला मिळो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
पोलीस प्रशासनाने तात्काळ बेड्या ठोकल्या पाहिजेत
या घटनेच्या पार्श्वभूमीवर खा. बजरंग सोनवणे यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था मजबूत ठेवण्याचे आवाहन केले. बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. टाकळी येथील घटनेतील आरोपींना पोलीस प्रशासनाने तात्काळ बेड्या ठोकल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.
पुनरावृत्ती रोखण्यासाठी उपाययोजना करा
जिल्ह्यात तरुणांमधील वाढती गुन्हेगारी आणि आपसांतील वाद चिंताजनक बनत चालले आहेत. अशा संवेदनशील घटनांची जिल्ह्यात कुठेही पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी पोलीस प्रशासनाने केवळ कारवाई न करता भविष्यात आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी स्पष्ट भूमिका खा. बजरंग सोनवणे यांनी मांडली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलीस गांभीर्याने करत असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

COMMENTS