Homeताज्या बातम्यादेश

बलात्कार पीडितांवरील वक्तव्य भोवणार ?

राहुल गांधींची दिल्ली पोलिसांकडून चौकशी

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारत जोडो यात्रेदरम्यान काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी केलेले एक विधान त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. बलात्कार पीडि

सत्तांतराच्या हालचालींना वेग
कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची हत्या | LokNews24
नगरच्या उपनगरांची भुयारी गटार योजना अडकली वादात

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारत जोडो यात्रेदरम्यान काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी केलेले एक विधान त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. बलात्कार पीडितांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी राहुल गांधी यांची चौकशी केली. यावेळी दिल्लीच्या विशेष पोलिस आयुक्तांनी राहुल गांधी यांची भेट घेतली असून त्यांना काही प्रश्‍न विचारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तब्बल दोन तास राहुल गांधी यांची चौकशी केली असून त्याचा तपशीलही माध्यमांसमोर जारी केला आहे. आम्ही राहुल गांधी यांना बलात्कार पीडितांसंदर्भात केलेल्या वक्तव्यांची माहिती मागितली असून त्यांनी आम्हाला थोडा वेळ मागितला असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान अनेक लोकांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी बोलताना देशातील बलात्कार पीडितांबाबत एक वक्तव्य केले होते. त्यासंदर्भात आम्ही माहिती गोळा करत असून आवश्यकता भासल्यास राहुल गांधींची पुन्हा चौकशी केली जाणार असल्याचे दिल्लीचे विशेष पोलिस आयुक्त सागर प्रीत हुड्डा यांनी म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वीच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांची चौकशी केल्यामुळे यावरून काँग्रेस आणि भाजपत राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे. भारत जोडो यात्रा 30 जानेवारीला श्रीनगरमध्ये पोहचली होती. त्यावेळी उपस्थितांशी बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते की, अनेक महिलांनी माझी भेट घेतली आहे. त्यातील काही महिलांवर बलात्कार करण्यात आल्याचे त्यांनी मला सांगितले. त्या खूप दुखी असल्याने मी त्यांना या प्रकरणाची माहिती पोलिसांना देऊ का?, असे विचारले होते. परंतु त्यांना ही बाब केवळ मलाच सांगायची होती. कारण याबाबतची माहिती पोलिसांना कळाली तर त्यांना अधिक नुकसान सहन करावे लागू शकते, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते.

45 दिवस पोलीस झोपले होते का? काँगे्रसची टीका – काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी बलात्कार पीडितांविषयी वक्तव्य करून तब्बल 45 दिवसांचा कालावधी लोटला असतांना, पोलिस आता या प्रकरणाची चौकशी करत आहे, याचाच अर्थ पोलिस  सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप काँगे्रसकडून करण्यात आला आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी, अशोक गेहलोत आणि पवन खेडा यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, अवघ्या तीन दिवसांत नोटीस देऊन पोलीस राहुल गांधींच्या घरी पोहोचले आणि तेही 45 दिवसांनी. राहुल गांधी सरकारला अवघड प्रश्‍न विचारत असल्याने हे सर्व घडत आहे का? हा निव्वळ छळ आहे,’ अशी टीका त्यांनी केली. ते पुढे म्हणाले, ’16 मार्च रोजी सकाळी राहुल गांधींना नोटीस देण्यात आली होती आणि त्यात दोन पानांचे प्रश्‍न होते, ज्यामध्ये राहुल गांधींना भारत जोडो यात्रेदरम्यान भेटलेल्या लाखो लोकांची माहिती देण्यास सांगितले. असे प्रश्‍न तुम्ही आतापर्यंत किती पक्षांना विचारला आहे? गेल्या 70 वर्षांत कोणत्याही राजकीय प्रचारात असे प्रश्‍न विचारले गेले असतील, असे मला वाटत नाही. आश्‍चर्याची बाब म्हणजे 45 दिवस पोलिस काहीच बोलले नाहीत आणि अचानक पोलीस खडबडून जागे झाले. इतक्या दिवस पोलीस झोपले होते का? हे सूडाचे राजकारण आहे,’ असे ते म्हणाले.

COMMENTS