मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतल

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. सकाळी सुमारे ८.२० वाजता राज ठाकरे यांचा ताफा ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाला. सत्ताधारी भाजप आणि महायुतीवर अलीकडच्या काळात सातत्याने टीका करणाऱ्या राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
या भेटीत मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक हेदेखील उपस्थित होते. ही भेट अचानक ठरलेली नसून दोन दिवसांपूर्वीच तिचे नियोजन करण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या भेटीमागे नेमके कोणते मुद्दे होते, याबाबत विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाची पुनर्रचना, मैदानातील क्रीडा सुविधा, खेळाडूंच्या अडचणी आणि संबंधित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करून रस्त्यांच्या दुरावस्थेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यातील रखडलेली कामे आणि प्रवाशांच्या अडचणींबाबतही त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असण्याची शक्यता आहे.
ही भेट प्रामुख्याने मुंबईतील प्रश्नांशी संबंधित असल्याचे सांगितले जात असले, तरी सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तिचे महत्त्व वाढले आहे. अलीकडेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय जवळीक निर्माण झाली आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित राजकीय वाटचालीची भूमिका घेतल्याने राज्यातील राजकीय समीकरणांमध्येही बदलाची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या भेटीत कोणताही राजकीय निर्णय झाला आहे किंवा नव्या समीकरणांबाबत चर्चा झाली आहे, असे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.
“यामध्ये विशेष काही नाही” – संजय राऊत राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “राज ठाकरे राज्यातील विविध प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटले असतील. विशेषतः रस्त्यांवरील खड्डे आणि अन्य नागरी प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भेटीचा विशेष राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही,” असे राऊत यांनी म्हटले.

COMMENTS