नवी दिल्ली - दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या विमानात उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विमानात बसल्यानंतर अचानक तापमान वाढ

नवी दिल्ली – दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या विमानात उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विमानात बसल्यानंतर अचानक तापमान वाढल्याने अनेक प्रवाशांना अस्वस्थ वाटू लागले, तर काही वयोवृद्ध प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास झाला. परिस्थिती गंभीर असतानाही विमान धावपट्टीकडे नेण्यात आल्याने प्रवाशांनी उड्डाणास तीव्र विरोध केला. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अखेर विमानातील बिघाड लक्षात आला आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानाबाहेर काढण्यात आले, त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या या विमानात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक प्रवासी होते. विमानात बसल्यानंतर काही वेळांतच आतील तापमान अचानक वाढले. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. अनेक प्रवासी घामाने भिजले, तर काहींना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. परिस्थिती लक्षात घेऊन प्रवाशांनी विमानाचे उड्डाण करू नये, अशी मागणी केली. मात्र, विमान धावपट्टीवर नेण्यात आल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. काही प्रवाशांनी आरडाओरड करत उड्डाणास विरोध केला. विमानातील कर्मचारी आणि वैमानिकांनी प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विमानात तांत्रिक समस्या असल्याचे निदर्शनास आले. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रवाशांना विमानाबाहेर काढण्यात आले. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. विमानतळावर काही काळ प्रवाशांनी ठिय्या देत विमान कंपनीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

COMMENTS