Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

15 ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; ब्लॅकस्पॉट कमी करण्याचे निर्देश;खा. बजरंग सोनवणे यांचा अधिकार्‍यांना इशारा

बीड : मागील दोन वर्षांत रेल्वे प्रकल्पाला गती मिळाल्यानंतर आता उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करून 15 ऑगस्ट 2026 पर्यंत पुणे-परळी रेल्वे मा

पोलीस खात्याच्या निधीवर सा. बां. चा दरोडा
वाडी (बु.) उपजिल्हा रुग्णालयासह नांदेड उत्तरमधील सर्व विकासकामांना गती द्या;नियोजित मुदतीत कामे पूर्ण करण्याच्या आ.कल्याणकर यांच्या अधिकार्‍यांना सूचना
उत्खनन रॉयल्टी, बिनशेती प्रक्रिया होणार डिजिटल; बांधकाम क्षेत्रासाठी दिलासा : महसूलमंत्री बावनकुळे यांनी क्रेडाईचे प्रश्‍न लावले मार्गी

बीड : मागील दोन वर्षांत रेल्वे प्रकल्पाला गती मिळाल्यानंतर आता उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करून 15 ऑगस्ट 2026 पर्यंत पुणे-परळी रेल्वे मार्ग सुरू करावा, असे स्पष्ट निर्देश खासदार बजरंग सोनवणे यांनी दिले. याचबरोबर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व ग्रामीण रस्त्यांवरील अपघातप्रवण ब्लॅकस्पॉट तातडीने कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचेही आदेश त्यांनी अधिकार्‍यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागात आयोजित रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन तसेच रेल्वे व महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रलंबित कामे, भूसंपादन, निकृष्ट दर्जाचे बांधकाम, अपघातप्रवण ठिकाणे आणि नागरिकांच्या अडचणी यावर सविस्तर चर्चा झाली. सोनवणे यांनी अंबाजोगाई, केज, नेकनूर, मांजरसुंबा, पाटोदा व माजलगाव शहरांभोवती बायपास व उड्डाणपूल उभारण्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच पिंपळा धायगुडा-लोखंडी सावरगाव-केज-मांजरसुंबा-पाटोदा-चुंबळी फाटा या मार्गाचे दुहेरीकरण तातडीने करण्याचे निर्देश दिले. अंबाजोगाईतील यशवंतराव चव्हाण चौकात फूटओव्हर ब्रिज उभारण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्गासाठी आवश्यक भूसंपादनाची स्थितीही तपासण्यात आली. खरवंडी-मादळमोही-पाडळसिंगी-गढी-माजलगाव मार्गावरील खराब रस्त्यामुळे होणार्‍या अपघातांवर चिंता व्यक्त करत तातडीने दुरुस्तीचे आदेश देण्यात आले.
पालखी मार्गावर नाराजी
पैठण-पंढरपूर मार्गावरील डोंगरकिन्ही ते पारगाव (अनपटवाडी) या भागातील अत्यंत खराब रस्ते, मळेकर घाटातील अपूर्ण कामे व वाढते अपघात यावर सोनवणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पाटोदा शहरातील अपूर्ण कामे निकषानुसार पुन्हा करण्याचे व संबंधित एजन्सीवर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले.
खोदलेले रस्ते तातडीने दुरुस्त करा
माजलगाव तालुक्यातील सादोळा येथील खोदलेला रस्ता त्वरित सुरू करण्याचे, तेलगाव येथे साचणारे पावसाचे पाणी काढण्याचे आणि मांजरसुंबा-अंबाजोगाई मार्गावरील खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात आले.
रेल्वे कामांचा सखोल आढावा
अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या सर्व टप्प्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. 31 मेपर्यंत परळीपर्यंत ट्रॅक पूर्ण, जूनमध्ये रेल्वे चाचणी अपेक्षित, आष्टी स्थानकास वीज जोडणी, बीड-वडवणी, वडवणी-सिरसाळा व सिरसाळा-परळी टप्प्यांतील कामांची माहिती घेण्यात आली. तसेच बीड-नगर-मुंबई आणि बीड-नगर-पुणे इंटरसिटी सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. बार्शी नाका येथे अतिरिक्त रेल्वे थांबा, स्थानकांवर पार्किंग सुविधा आणि सोलर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे निर्देश देण्यात आले. उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद रेल्वेमार्ग सर्वेक्षण व प्रलंबित भूसंपादन प्रकरणे तातडीने निकाली काढण्यावर भर देण्यात आला.
स्थानिक समस्यांकडे लक्ष
रेल्वेमुळे शेतीमाल वाहतुकीतील अडथळे, पुलाखाली साचणारे पाणी, अपूर्ण रस्ते, लाईट सुविधा नसणे तसेच भूसंपादनातील अनियमितता या गंभीर मुद्द्यांवर चर्चा झाली. रायमोहा, शिरापूर, मोरजळवाडी, गोमळवाडा, विघ्नवाडी, नागरेचीवाडी येथील समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
बीड शहरातील कामावर नाराजी
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने सोनवणे यांनी अधिकार्‍यांना फैलावर घेतले. बीडकरांना होणारा त्रास तात्काळ कमी झाला नाही, तर कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
घाटनांदूर येथे रेल्वे थांबा आवश्यक
घाटनांदूर रेल्वे स्थानकावर विविध गाड्यांना थांबा देण्यासाठी तातडीने केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश देत, त्यासाठी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट केले.

COMMENTS