मुंबई/नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासमोर पुन्हा एकदा अंतर्गत बंडाचे संकट उभे राहिल्याचे चित्र दिसत असून, पक्षाच्या सहा खासदार

मुंबई/नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासमोर पुन्हा एकदा अंतर्गत बंडाचे संकट उभे राहिल्याचे चित्र दिसत असून, पक्षाच्या सहा खासदारांनी संसदीय दलाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्यानंतर पक्ष नेतृत्वाने आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावत 24 तासांत समाधानकारक स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा त्यांच्याविरोधात पक्षांतरबंदीच्या तरतुदींनुसार अपात्रतेची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
लोकसभेतील पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर या खासदारांना नोटीस पाठवली आहे. पक्षाच्या अधिकृत बैठकीस अनुपस्थित राहण्यामागील कारण लेखी स्वरूपात स्पष्ट करण्यासाठी त्यांना मर्यादित मुदत देण्यात आली आहे. पक्षाच्या नोटीसमध्ये नमूद केल्यानुसार, निर्धारित कालावधीत समाधानकारक उत्तर न दिल्यास संबंधित खासदारांनी स्वेच्छेने पक्षाशी असलेली निष्ठा सोडल्याचे मानले जाऊ शकते. अशा परिस्थितीत पक्ष नेतृत्वाला पुढील कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा होणार आहे. या प्रकरणात सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याचा वापर. पक्षाच्या निर्देशांचे पालन न करणे आणि संघटनात्मक शिस्त मोडल्याचा आरोप करत संबंधित खासदारांविरोधात संविधानातील पक्षांतरबंदीच्या तरतुदींनुसार कारवाईची मागणी केली जाऊ शकते. आवश्यक असल्यास लोकसभा अध्यक्षांकडे अपात्रतेसाठी औपचारिक अर्ज दाखल करण्याचाही पर्याय पक्षाकडे उपलब्ध आहे. या घडामोडीमागे पक्षाच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत असलेल्या चर्चांचा संदर्भ दिला जात आहे. काही राजकीय वर्तुळांत पक्षाच्या संभाव्य राजकीय निर्णयांबाबत विविध तर्कवितर्क मांडले जात असले, तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी अशा चर्चांना कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी बंडखोरीमागे वैचारिक कारणांपेक्षा राजकीय स्वार्थ असल्याचा आरोप केला आहे.

COMMENTS