मुंबई : राज्यात मान्सूनचे बहुतांश भागांमध्ये आगमन झाले असले, तरी अनेक ठिकाणी अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यंदा मान्सूनच्या उशिरा

मुंबई : राज्यात मान्सूनचे बहुतांश भागांमध्ये आगमन झाले असले, तरी अनेक ठिकाणी अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यंदा मान्सूनच्या उशिरा झालेल्या आगमनामुळे खरीप हंगामातील पेरण्या आणि शेतीची कामे काही प्रमाणात रखडली होती. मात्र, आता हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यात मान्सून अधिक सक्रिय होण्याचा अंदाज वर्तविल्याने शेतकर्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पालघर, ठाणे आणि मुंबई परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वार्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा परिसरातही पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून, बीड जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, केज आणि माजलगाव तालुक्यांत झालेल्या दमदार पावसामुळे खरीप पेरण्यांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, परळी तालुक्यात अद्याप पुरेशा पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांतही विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यात ग्रामीण भागात झालेल्या पावसामुळे शेतीकामांना वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील अंजनविहिरे परिसरात झीरी नदीला पहिल्याच दमदार पावसात पूर आला असून नदीवरील बंधारा पाण्याखाली गेला आहे. नाल्यांमध्ये वाढलेल्या प्रवाहामुळे विहिरी आणि बोरवेलमध्ये पाणी साचू लागल्याने जलस्रोतांना नवसंजीवनी मिळाल्याचे स्थानिक शेतकर्यांनी सांगितले. नंदुरबार जिल्ह्यात जूनअखेर सरासरी 11.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अक्कलकुवा तालुक्यात सर्वाधिक 33.4 मिलीमीटर, तर नंदुरबार तालुक्यात 17.1 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, पावसाच्या आगमनामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आगामी काही दिवस मान्सूनची सक्रियता कायम राहिल्यास शेती, जलसाठे आणि जनजीवनासाठी सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अनुकूल परिस्थिती
मान्सूनची प्रगती उत्तर अरबी समुद्र, गुजरात, महाराष्ट्रातील उर्वरित भाग, तसेच छत्तीसगड आणि मध्य प्रदेशाकडे वेगाने होत आहे. पश्चिमेकडील वार्यांचा वेग वाढला असून समुद्रकिनारी कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोकण विभागात मुसळधार पावसाचा प्रभाव कायम राहण्याची चिन्हे आहेत.

COMMENTS