भोकर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भोकर शाखेच्या नव्या वास्तूच्या लोकार्पणासाठी सध्या मोठी लगबग सुरू असली, तरी या चमकदार सोहळ्यामागील वास्तव

भोकर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भोकर शाखेच्या नव्या वास्तूच्या लोकार्पणासाठी सध्या मोठी लगबग सुरू असली, तरी या चमकदार सोहळ्यामागील वास्तव मात्र अस्वस्थ करणारे आहे. एका बाजूला मंत्री, खासदार, माजी आमदार आणि विविध पक्षांतील बडे नेते व्यासपीठावर झळकणार आहेत, तर दुसर्या बाजूला बँकेचे खरे मालक असलेले शेतकरी, सभासद आणि सामान्य कर्जदार अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत उभे आहेत.
भव्य इमारतीचे लोकार्पण विकासाचा चेहरा म्हणून रंगवले जात असले, तरी ग्रामीण भागातील शेतकर्यांची स्थिती आजही बदललेली नाही. पीककर्जासाठी वारंवार फेर्या, कागदपत्रांच्या नावाखाली अडवणूक, थकीत कर्जामुळे होणारी मानसिक घुसमट आणि आर्थिक विवंचना यामुळे अनेक कुटुंबे होरपळत आहेत. अशा वेळी लाखो रुपयांचा सोहळा उभारून कोणाचा विकास साजरा केला जात आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कालपर्यंत एकमेकांवर आरोपांची फैर झाडणारे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आता एकाच मंचावर दिसणार आहेत. सहकाराच्या नावाखाली सुरू असलेले हे राजकीय एकत्रीकरण नेमके बँकेसाठी आहे की स्वतःच्या राजकीय वारसदारांसाठी, याबाबत नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक माजी आमदार आणि स्थानिक नेत्यांना बँकेच्या भवितव्यापेक्षा स्वतःच्या राजकीय भविष्याचीच अधिक चिंता असल्याचे बोलले जात आहे. बँकेने संचित तोट्यातून बाहेर पडल्याचे दावे केले जात आहेत. मात्र त्याचा फायदा शेतकर्यांच्या खात्यात किती जमा झाला? व्याजदर कमी झाले का? पीककर्ज सहज मिळते का? सभासदांना लाभांश मिळाला का? ग्रामीण भागातील शाखांमध्ये सेवा सुधारली का? या प्रश्नांची ठोस उत्तरे अद्याप कुणाकडे नाहीत. स्थानिक शेतकरी प्रतिनिधींनी संताप व्यक्त करत म्हटले, भव्य इमारती उभारून बँक मजबूत होत नाही. शेतकर्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले, तरच बँकेची ताकद सिद्ध होते. उद्याचा सोहळा हा सहकाराचा उत्सव ठरणार की राजकीय शक्तीप्रदर्शनाचा तमाशा, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र एवढे निश्चित – शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहे, आणि व्यासपीठावरचे चेहरे मात्र समाधानी दिसत आहेत.

COMMENTS