नांदेड : गेल्या महिन्यात शहर आणि जिल्ह्यात सलग घडलेल्या पाच खुनांच्या घटनांनंतर टीकेच्या केंद्रस्थानी आलेल्या नांदेड पोलिसांनी आता गुन्हेगारीविरो

नांदेड : गेल्या महिन्यात शहर आणि जिल्ह्यात सलग घडलेल्या पाच खुनांच्या घटनांनंतर टीकेच्या केंद्रस्थानी आलेल्या नांदेड पोलिसांनी आता गुन्हेगारीविरोधात व्यापक मोहीम उघडली आहे. अट्टल गुन्हेगार, संघटित टोळ्या आणि अवैध धंद्यांच्या सूत्रधारांना लक्ष्य करत पोलिस प्रशासनाने कठोर प्रतिबंधात्मक कारवाईची तयारी सुरू केली असून, 22 सक्रिय गुंडांना ‘एमपीडीए’ अंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पुढे सरकला आहे. त्याचबरोबर पाच गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मोक्का’ लागू करण्यासाठी हालचाली वेगाने सुरू आहेत.
नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे वाढते सावट, विशेषतः अल्पावधीत घडलेल्या खुनांच्या मालिकेमुळे पोलिस दलावर मोठा दबाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेची नव्याने पुनर्रचना करण्यात आली. नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांनी जिल्ह्यातील सक्रिय गुन्हेगारांच्या हालचालींचा सखोल अभ्यास सुरू करत थेट ‘हाय रिस्क’ गुंडांवर लक्ष केंद्रित केले. रेकॉर्डवरील जुन्या गुन्हेगारांसोबतच नव्याने गुन्हेगारीत सक्रिय झालेल्या टोळ्यांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. समाजासाठी धोकादायक ठरत असलेल्या 22 जणांविरोधात एमपीडीएअंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठविण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत संबंधित आरोपींना किमान सहा महिन्यांसाठी कारागृहात स्थानबद्ध करता येते. दुसरीकडे संघटित गुन्हेगारीच्या कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या पाच टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात ‘मोक्का’ लावण्याचा प्रस्ताव पोलिस उपमहानिरीक्षकांकडे सादर करण्यात आला आहे. प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत असतानाच संशयित गुन्हेगार फरार होऊ नयेत म्हणून पोलिसांनी त्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवत धरपकड मोहीम सुरू केली आहे. गुन्हेगारीला आर्थिक बळ देणारे मटका, जुगार, अवैध दारू आणि क्रिकेट सट्ट्याचे व्यवहार मोडून काढण्यासाठी पोलिसांनी रणनीती बदलली आहे. केवळ अड्ड्यांवर धाडी घालण्याऐवजी आता थेट या धंद्यांचे मालक, सूत्रधार आणि आर्थिक साखळी नियंत्रित करणार्यांवर गुन्हे दाखल करून तडीपारीची कारवाई केली जात आहे. मारहाण, दहशत आणि शरीरासंबंधी गुन्ह्यांमध्ये वारंवार सहभागी होणार्या 45 सराईत गुंडांची स्वतंत्र ‘हिटलिस्ट’ स्थानिक गुन्हे शाखेने तयार केली आहे. या गुंडांना थेट पोलिसी इशारा देण्यात आला असून, जिल्ह्यात कुठेही गुन्हेगारी कारवाया आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेतील काही कर्मचार्यांवर यापूर्वी ‘कलेक्शन’कडे अधिक लक्ष असल्याची टीका होत होती. या पार्श्वभूमीवर निरीक्षक अतुल भोसले यांनी कर्मचार्यांना स्पष्ट शब्दांत इशारा देत, कामगिरी दाखवा; अन्यथा मूळ नेमणुकीवर परत जावे लागेल, असा संदेश दिल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे. सलग खुनांच्या घटनांनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या बदलीची चर्चा रंगू लागली होती. मात्र, तपासात बहुतांश खुनांना वैयक्तिक व कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी असल्याचे समोर आले. याशिवाय, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा एप्रिलपर्यंत खुनांचे प्रमाण कमी असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांच्या बदलीची शक्यता कमी मानली जात आहे. पोलिस दलातील सूत्रांच्या माहितीनुसार, अबीनाश कुमार यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी अद्याप सुमारे सहा महिने शिल्लक आहेत. दिवाळीनंतर किंवा पुढील सर्वसाधारण बदल्यांमध्ये त्यांची बदली होण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी ते ईडी किंवा सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांमध्ये प्रतिनियुक्तीसाठी इच्छुक असल्याचीही चर्चा आहे. स्थानिक गुन्हे शाखेसमोर आता सर्वात मोठे आव्हान देगलूर, बिलोली आणि धर्माबाद भागातील प्रभावशाली क्रिकेट बुकी, मटका किंग आणि रेती माफियांवर कारवाई करण्याचे आहे. या भागांतील अवैध धंद्यांचे ‘मोठे चेहरे’ आरोपी ठरवून त्यांच्यावर तडीपारीसारखी कठोर कारवाई केली जाते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विशेषतः धर्माबादमधील एका क्रिकेट बुकीविरोधात तेलंगणा पोलिसांनी आधीच दोन गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे आता नांदेड पोलिसांची कारवाई केवळ लहान अड्ड्यांपुरती मर्यादित राहते की मोठ्या सूत्रधारांपर्यंत पोहोचते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

COMMENTS