Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई ; ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’मध्ये 43 लाखांचा अवैध शस्त्रसाठा जप्त

नांदेड : जिल्ह्यातील अवैध धंदे, गुन्हेगारी आणि शस्त्रसाठ्याविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई क

मोडाल, तर पोलीस खाक्या दाखवणार-पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार
ऑपरेशन ‘क्रॅक डाऊन’ अंतर्गत अवैध रेती माफियावर पोलिसांचा छापा; 47.25 लाखांचा मुद्देमाल जप्त
गाजावाजा न करता एलसीबीत बदल; अतुल भोसले यांच्या खांद्यावर गुन्हेगारी रोखण्याची मोठी जबाबदारी

नांदेड : जिल्ह्यातील अवैध धंदे, गुन्हेगारी आणि शस्त्रसाठ्याविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई करत तब्बल 43 लाख 48 हजार रुपये किमतीचा अवैध शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईत तलवारी, गुप्त्या, खंजरांसह एकूण 4 हजार 796 घातक हत्यारे हस्तगत करण्यात आली असून दोन आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार 6 मे रोजी रात्री नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली बळीरामपूर परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते. यावेळी अभिजीत गिरीधर सातपुते हा तरुण कमरेला तलवार व खंजर लावून संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुरुरामदास नगर परिसरातून ही हत्यारे खरेदी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुरुरामदास नगर येथील एका खोलीवर छापा टाकला. पोलिसांना पाहताच तेथील एक इसम पसार झाला. मात्र, खोलीची झडती घेतल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसावा असा मोठा शस्त्रसाठा आढळून आला.
तपासादरम्यान हा साठा जसवंतसिंग प्रकाशसिंग सुखमणी (रा. अबचलनगर) याचा असल्याचे समोर आले. पोलिसांनी या ठिकाणाहून 315 मोठ्या तलवारी, 135 छोट्या तलवारी, 338 गुप्त्या तसेच 3 हजार 700 हून अधिक विविध प्रकारचे खंजर जप्त केले. यात फोल्डिंग खंजर, कुकरी, नकल खंजर यांसारख्या धोकादायक शस्त्रांचाही समावेश आहे. याशिवाय हातोडे, पक्कड आणि इतर अवजारेही पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम 4/25 आणि 7/25 अन्वये नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस अधिकारी सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे.

COMMENTS