Homeताज्या बातम्यापुणे

पुणे पोलिस दलातील लाचखोरीवर पोलिस आयुक्तांचा संताप

पुणे : पुणे पोलिस दलातील वाढत्या लाचखोरीच्या घटनांमुळे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेतल

देवळालीत हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापा चौघांवर गुन्हा ; ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त
जबरी चोरी करणारी सराईत टोळी जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त
राशीनमध्ये हातभट्टीवर पोलिसांचा छापा७८० लिटर रसायन व दारू नष्ट


पुणे : पुणे पोलिस दलातील वाढत्या लाचखोरीच्या घटनांमुळे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. पोलिस दलाची प्रतिमा स्वच्छ आणि पारदर्शक राखण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांच्या अधिकार्‍यांनी अधिक जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. तसेच सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांना थेट कारागृहात पाठवण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
अलीकडच्या काळात पुणे पोलिस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर लाचखोरीचे आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. लोहगाव पोलिस ठाण्यातील एका उपनिरीक्षकाला अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्याच्या बदल्यात मोठी रक्कम स्वीकारताना पकडण्यात आले. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेतील महिला सहायक निरीक्षकासह दोघांवर मोठ्या रकमेची लाच घेतल्याचा आरोप समोर आला. तसेच कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यातील एका हवालदारावर न्यायालयीन अटक आदेशाची अंमलबजावणी टाळण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप आहे. यापूर्वीही गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी एका अधिकार्‍यावर कारवाई झाली होती.या सलग घटनांमुळे पोलिस दलाच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍न उपस्थित होत असल्याची खंत आयुक्तांनी व्यक्त केली. शहरातील सर्व वरिष्ठ निरीक्षकांच्या बैठकीत त्यांनी बेकायदा धंद्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. कायद्याचे रक्षण करणार्‍या यंत्रणेमध्ये भ्रष्टाचाराला कोणतीही माफी दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांबाबतही गंभीर चर्चा करण्यात आली. अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचारांच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने अशा प्रकरणांचा तपास जलदगतीने पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. आरोपींना कायद्याच्या कचाट्यातून सुटता येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना अधिकार्‍यांना करण्यात आल्या. ज्या आरोपींविरुद्ध महिलांवरील अत्याचार, विनयभंग किंवा बलात्कारासारखे दोनपेक्षा अधिक गंभीर गुन्हे नोंद आहेत, त्यांच्याविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

COMMENTS