बीड : राज्यस्तरीय साहित्य संस्था काव्यप्रेमी शिक्षक मंच, सोलापूर यांच्या वतीने दिला जाणारा ‘कै. सौ. संजिवनी यशवंत मराठे स्मृती काव्यप्रेमी प्रेरण

बीड : राज्यस्तरीय साहित्य संस्था काव्यप्रेमी शिक्षक मंच, सोलापूर यांच्या वतीने दिला जाणारा ‘कै. सौ. संजिवनी यशवंत मराठे स्मृती काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार 2026’ बीड येथील प्रसिद्ध कवी द. ल. वारे यांना जाहीर करण्यात आला आहे.
मागील दशकभरापासून मराठी साहित्य, संस्कृती आणि भाषा विकासासाठी विविध उपक्रम राबवणार्या या संस्थेने राज्यभरात साहित्य संमेलन, कवी संमेलन, कार्यशाळा आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून संस्थेतर्फे मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्या साहित्यिकांना सन्मानित करण्याची परंपरा कायम आहे. द. ल. वारे यांनी मैत्राच्या बोधकथा आणि गार्डन ऑफ राईम्स या पुस्तकांद्वारे साहित्य क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडली आहे. त्यांच्या या साहित्यकृती महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केल्या आहेत. तसेच गेल्या सहा वर्षांपासून ते आजचा रट्टा ही दैनिक वात्रटिका नियमितपणे चालवत असून त्यांच्या लेखनातून सामाजिक व समकालीन विषयांवर प्रभावी भाष्य केले जाते. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, 10 मे 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत लोकमान्य टिळक सभागृह, श्री. हिराचंद नेमचंद वाचनालय येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. इ. ज. तांबोळी भूषविणार असून प्रकाश महानवर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुहास पुजारी आणि पद्माकर कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्यात राज्यस्तरीय कवी संमेलनासह विविध स्पर्धांतील विजेत्यांनाही पारितोषिके प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे राज्याध्यक्ष आनंद घोडके, राज्य सचिव कालिदास चवडेकर आणि कोषाध्यक्ष कृष्णा शिंदे यांनी दिली आहे.

COMMENTS