बीड : पर्यावरण संरक्षण आणि अक्षय ऊर्जेच्या वापराकडे एक पाऊल टाकत, शहरातील आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात नवीन बायोगॅस प्लांट

बीड : पर्यावरण संरक्षण आणि अक्षय ऊर्जेच्या वापराकडे एक पाऊल टाकत, शहरातील आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात नवीन बायोगॅस प्लांटची यशस्वीरीत्या जोडणी करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे महाविद्यालयाचा परिसर आता ’झिरो वेस्ट’ (शून्य कचरा) मॉडेलकडे वाटचाल करणार असून, कॅन्टीन आणि हॉस्टेलमधील सेंद्रिय कचर्यापासून गॅस निर्मिती केली जाणार आहे.
आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली संचालिका डॉ. आदिती सारडा यांच्या प्रेरणेतून कॅम्पसमध्ये शाश्वत विकासाचे विविध उपक्रम राबवले जातात. याच मालिकेत हा बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे संचालक, प्राध्यापक आणि विद्यार्थी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे आदित्य महाविद्यालयाने शिक्षण क्षेत्रासोबतच पर्यावरण संवर्धनातही आपला वेगळा ठसा उमटवला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या प्रकल्पामुळे एलपीजी सिलिंडरवर होणारा मोठा खर्च आता कमी होणार आहे, कचरा व्यवस्थापन सोपे झाल्याने कॅम्पस स्वच्छ राहील, कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना बायोगॅस तंत्रज्ञानाचे व्यावहारिक ज्ञान मिळेल, रासायनिक खतांचा वापर थांबवून दर्जेदार सेंद्रिय खताची निर्मिती होईल.
असा आहे प्रकल्प
या प्रकल्पाची क्षमता 6 क्यूबिक मीटर आणि 1 क्यूबिक मीटर अशी असून, यामध्ये प्रामुख्याने कॅन्टीनमधील भाजीपाल्याचे अवशेष, उरलेले अन्न, शेण, पालापाचोळा आणि इतर सेंद्रिय कचरा वापरला जाणार आहे. या प्रक्रियेतून निर्माण होणारा गॅस स्वयंपाकासाठी वापरला जाणार असून, उरलेली स्लरी (द्रव खत) महाविद्यालयातील रोपवाटिका आणि बागकामासाठी वापरण्यात येईल.
हा प्लांट केवळ ऊर्जा बचतीचे साधन नसून विद्यार्थ्यांना शाश्वत विकासाचे प्रत्यक्ष धडे देणारे केंद्र ठरेल. स्वच्छ कॅम्पस, हरित कॅम्पस हे आमचे ध्येय आहे.
-डॉ. आदिती सारडा, संचालक

COMMENTS