नांदेड : जिल्ह्यातील विविध विकास योजना, प्रलंबित कामे आणि नागरिकांशी निगडित मूलभूत सुविधांचा सर्वंकष आढावा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती

नांदेड : जिल्ह्यातील विविध विकास योजना, प्रलंबित कामे आणि नागरिकांशी निगडित मूलभूत सुविधांचा सर्वंकष आढावा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत घेण्यात आला. जलजीवन मिशन, महावितरण, रस्ते विकास, कृषी, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन तसेच राष्ट्रीय महामार्ग यांसह विविध योजनांबाबत संबंधित विभागांना ठोस सूचना देण्यात आल्या. समितीचे अध्यक्ष तथा रविंद्र चव्हाण यांनी विकासकामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे ही बैठक पार पडली. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार शिवाजी काळगे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सर्वप्रथम मागील बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता देण्यात आली. त्यानंतर विविध विभागांनी प्रगती अहवाल सादर केला. प्रत्येक बैठकीनंतर संबंधित विभागांनी अनुपालन अहवाल सादर करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट निर्देश अध्यक्षांनी दिले. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेताना खा.अशोकराव चव्हाण यांनी पूर्ण व अपूर्ण कामांची यादी, स्त्रोत उपलब्धता, निधी स्थिती आणि लाभार्थी गावांची माहिती मागवली. ज्या ठिकाणी कामे रखडली आहेत ती तातडीने मार्गी लावावीत, अशा सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या. शहर व जिल्ह्यातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, लोडशेडिंग आणि तांत्रिक अडचणींबाबत सर्वच लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील सर्व वीजवाहिन्या पुढील पाच वर्षांत भूमिगत करण्याचे नियोजन करावे, अशी सूचना रविंद्र चव्हाण यांनी केली. महावितरणकडून तरोडा भागात चार नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. इतर भागांतही अतिरिक्त यंत्रणा उभारण्याचे काम सुरू असून समस्यांवर कृती आराखडा तयार केला जाईल, असे अधिकार्यांनी सांगितले. यंदा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यास 813 कोटी रुपयांचा परतावा मंजूर झाल्याबद्दल कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करण्यात आले. खताचा तुटवडा होऊ नये, युरियाचा पुरेसा साठा ठेवावा आणि खत लिंकिंगमुळे शेतकर्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या. शहरातील दैनंदिन पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि अमृत मिशन 2.0 योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. इस्लामपुरा परिसरातील खड्ड्यात पडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू झालेल्या घटनेची माहिती महापालिकेकडून घेण्यात आली. पीडित कुटुंबांना योग्य मदत मिळावी, असे निर्देश देण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, कृषी सिंचन योजना, पीएम सूर्यघर योजना, रेल्वे विभाग तसेच पाटबंधारे योजनांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. बारूळ धरण सिमेंट कॅनल कामात शेतजमिनीचे नुकसान होऊ नये, तसेच बाधित शेतकर्यांची जमीन पूर्ववत करावी, अशी मागणी शिवाजी काळगे यांनी केली. बैठकीच्या शेवटी विविध मतदारसंघांतील प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी संबंधित अधिकार्यांनी जबाबदारीने काम करावे, असे निर्देश देत आवश्यकतेनुसार स्वतंत्र बैठका घेण्यात येतील, असे अध्यक्षांनी स्पष्ट केले.

COMMENTS