एल.व्ही.प्रसाद आय इन्स्टिट्यूट, हैदराबाद (भोसले गोपाळराव पाटील आय सेंटर, मुधोळ), मुक्तांगण सेवाभावी संस्था, धर्माबाद तथा कै.के.रामलू साहेब प्रति

एल.व्ही.प्रसाद आय इन्स्टिट्यूट, हैदराबाद (भोसले गोपाळराव पाटील आय सेंटर, मुधोळ), मुक्तांगण सेवाभावी संस्था, धर्माबाद तथा कै.के.रामलू साहेब प्रतिष्ठान, कुंडलवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिरामध्ये एकूण 262 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान 82 रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे नवीन निदान झाले, तर 44 रुग्णांमध्ये डोळ्याच्या मांसवृद्धीचा (प्टेरीजियम) आजार आढळून आला. शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या रुग्णांवर मुधोळ येथील भोसले गोपाळराव पाटील आय सेंटरमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, आवश्यक त्या रुग्णांना मोफत लेन्सही बसविण्यात येणार आहेत. तसेच रुग्णांच्या ये-जा करण्यासाठी कुंडलवाडी नगरपरिषद येथून मोफत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. कार्यक्रमाचे उद्घाटन लक्ष्मणराव ठक्कुरवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा प्रेरणाताई कोटलावार होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्षा नेहाताई र्याकावार, साईनाथ उत्तरवार, प्रकाश पाटील अर्जूने, गंगाधर पोरडवार, गजानन कोटलावार, प्रा. डॉ. गोविंद चौधरी, डॉ. हनमंतराव लखमपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नगरपरिषदेतील सर्व नगरसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नरेश बोधनकर यांनी केले.

COMMENTS