आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ’आनंद अनुभूती’ शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. दि. 21 ते 26 जुलै या कालावधीत गेवर

आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ’आनंद अनुभूती’ शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. दि. 21 ते 26 जुलै या कालावधीत गेवराई येथील सिंधी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला विविध वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराला बीड शहराचे वरिष्ठ तसेच बेंगळुरू येथील वरिष्ठ प्रशिक्षक विश्वनाथ गडकर यांचे मार्गदर्शन लाभले. या सहा दिवसांच्या शिबिरात सहभागी नागरिकांना योग, ध्यान, प्राणायाम तसेच जगभर प्रसिद्ध असलेल्या ’सुदर्शन क्रिया’चे प्रशिक्षण देण्यात आले. तणावमुक्त जीवनशैली, सकारात्मक विचारसरणी, आत्मविश्वास वाढविणे, शांत झोप लागणे आणि दैनंदिन जीवन अधिक आनंदी व उत्साही कसे जगावे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात सहभागी झालेल्या अनेकांनी मानदुखी, पाठदुखी, पित्ताचा त्रास यांसारख्या विविध समस्यांमध्ये सकारात्मक बदल जाणवल्याचा अनुभव व्यक्त केला. तसेच दैनंदिन कामकाज कोणताही थकवा न जाणवता आनंदाने करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा या शिबिरातून मिळाल्याचे सहभागी नागरिकांनी सांगितले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी माधुरी कुलकर्णी, डॉ. महेश कुलकर्णी, आशा कुठे, प्रज्ञा गायकवाड यांच्यासह इतर स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान, इच्छुकांसाठी पुढील ’आनंद अनुभूती’ शिबिर दि. 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी 6 ते 9 या वेळेत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. शिबिरासाठी नोंदणी व अधिक माहितीसाठी 9657609777 आणि 9421480477 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS