डेहराडून ः उत्तराखंड राज्यातील आगामी चारधाम यात्रेसाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून, आतापर्यंत एकूण 14 लाख 54 हजार 897 यात्रेकरूंनी नो
डेहराडून ः उत्तराखंड राज्यातील आगामी चारधाम यात्रेसाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून, आतापर्यंत एकूण 14 लाख 54 हजार 897 यात्रेकरूंनी नोंदणी केली आहे. यात्रेच्या प्रारंभापूर्वीच एवढ्या मोठ्या संख्येने भाविकांनी नोंदणी केल्यामुळे यंदाची यात्रा विक्रमी ठरण्याची चिन्हे आहेत.
पर्यटन विभागाच्या माहितीनुसार, केदारनाथ धामासाठी सर्वाधिक म्हणजे 4 लाख 95 हजार 173 यात्रेकरूंनी नोंदणी केली आहे. त्यापाठोपाठ बद्रीनाथ धामासाठी 4 लाख 29 हजार 416, गंगोत्री धामासाठी 2 लाख 62 हजार 485 आणि यमुनोत्री धामासाठी 2 लाख 55 हजार 609 भाविकांनी नोंदणी केली आहे. तसेच हेमकुंड साहिब यात्रेसाठी 12 हजार 214 यात्रेकरूंनी आपली नोंदणी पूर्ण केली आहे. दरम्यान, हरिद्वार, ऋषिकेश, नयागाव आणि हर्बर्टपूर येथील नोंदणी केंद्रांवर आज प्रत्यक्ष नोंदणी प्रक्रिया बंद होती. ही प्रक्रिया 17 एप्रिलपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वी 6 मार्चपासून दूरस्थ नोंदणी प्रक्रिया सुरू असून, त्याला भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. यात्रेच्या नियोजित वेळापत्रकानुसार, गंगोत्री व यमुनोत्री धामांची कपाटे 19 एप्रिल रोजी भाविकांसाठी खुली होतील. त्यानंतर केदारनाथ धाम 22 एप्रिल रोजी, तर बद्रीनाथ धाम 23 एप्रिल रोजी उघडण्यात येणार आहे. राज्य सरकार व पर्यटन यंत्रणा यात्रेचे नियोजन सुरळीत, सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी तयारीत गुंतली आहे. भाविकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी प्रवास मार्गांची दुरुस्ती, आरोग्य सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि नोंदणी प्रणाली अधिक सक्षम करण्यात येत आहे. देशांतर्गत तसेच परदेशातील भाविकांना सुखकर आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळावा, यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

COMMENTS