नवी दिल्ली : देशातील विविध भागांमध्ये मान्सूनचा प्रभाव वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येत आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे शनिवारी रात्री झालेल्या ढ
नवी दिल्ली : देशातील विविध भागांमध्ये मान्सूनचा प्रभाव वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येत आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे शनिवारी रात्री झालेल्या ढगफुटीमुळे अचानक पूरस्थिती निर्माण झाली. पुराच्या पाण्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असून अनेक अंतर्गत रस्ते वाहून गेले आहेत. प्रशासनाने प्रभावित भागात मदत आणि पाहणीचे काम सुरू केले आहे.
उत्तराखंडमधील विकासनगर परिसरात मुसळधार पावसामुळे लखवाड जलविद्युत प्रकल्पाजवळ मोठे भूस्खलन झाले. डोंगराचा मोठा भाग कोसळल्याने तेथे उभी असलेली अनेक वाहने तसेच कामासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री मातीच्या ढिगार्याखाली दबली गेली. सुदैवाने या घटनेत मोठ्या जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही; मात्र परिसरात सतर्कता वाढविण्यात आली आहे. दुसरीकडे, देशातील सुमारे 70 टक्के भागात मान्सूनची तीव्रता कमी झाल्याचे चित्र आहे. राजस्थान, दिल्ली परिसर, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता अत्यल्प असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. पाऊस थांबल्यामुळे उत्तर आणि मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. राजस्थानातील श्रीगंगानगर येथे कमाल तापमान 42 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याची नोंद झाली आहे. याचदरम्यान हवामानाच्या दृष्टीने दिलासादायक संकेतही मिळत आहेत. प्रशांत महासागरात तीन स्वतंत्र हवामान प्रणाली विकसित होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. या प्रणालींचा प्रभाव पुढे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचल्यास 18 ते 25 जुलैदरम्यान देशातील अनेक भागांत मान्सून पुन्हा सक्रिय होऊन पावसाची नवी फेरी सुरू होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS