देहरादून : उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून चारधाम यात्रा मार्गावरील अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने प्रशासन

देहरादून : उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून चारधाम यात्रा मार्गावरील अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून चारधाम यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय सोमवारी घेण्यात आला. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गढवाल विभागाचे आयुक्त आनंद स्वरूप यांनी चारधाम यात्रेशी संबंधित सर्व जिल्हाधिकार्यांना आणि संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. यात्रा मार्गावर अडकलेल्या भाविकांना सुरक्षित ठिकाणी थांबवून मार्ग पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतरच पुढील प्रवासास परवानगी द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नागरिक आणि यात्रेकरूंना अधिकृत माध्यमांतून वेळोवेळी अचूक माहिती देण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, जेणेकरून अफवा आणि संभ्रमाला आळा बसेल. प्रशासनाच्या मते, सध्याची प्रतिकूल हवामानस्थिती आणि भूस्खलनाचा वाढलेला धोका लक्षात घेऊन ही खबरदारी घेण्यात आली आहे. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर आणि मार्ग सुरक्षित घोषित झाल्यानंतर चारधाम यात्रा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. तोपर्यंत भाविकांनी केवळ अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवून प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. देहरादून येथील हवामान विज्ञान केंद्राने सोमवारी राज्यातील बहुतांश भागांत हलका ते मध्यम पाऊस, तर अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. देहरादून, टिहरी आणि हरिद्वार जिल्ह्यांमध्ये काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता असून इतर जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस, वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. सकाळपासून राज्यातील अनेक भागांत पावसाची संततधार सुरू आहे.

COMMENTS