चौसाळा : जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, चौसाळा येथे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यातील समन्वय वाढविण्यासाठी पालक-शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात

चौसाळा : जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, चौसाळा येथे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यातील समन्वय वाढविण्यासाठी पालक-शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शिस्त, शाळेतील विविध उपक्रम, शिष्यवृत्ती योजना तसेच शाळेच्या विकासासाठी लोकसहभाग वाढविणे या विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. लक्ष्मण राऊत, मुख्याध्यापिका श्रीमती पद्मजा हंम्पे आणि शालेय समितीचे अध्यक्ष विनोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक सभागृहात सरस्वती माता व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी वाघे बाबुळगावचे मुख्याध्यापक हरिदास धनगर, शालेय समितीचे अध्यक्ष विनोद शिंदे, ग्रामपंचायत सदस्य विकास नाईकवाडे, ज्येष्ठ शिक्षक सुभाष काकड, महारुद्र झोडगे, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सुधीर चौधरी, नंदू आबा जोगदंड, बाबासाहेब बोबडे, विष्णू कळसे, प्रमोद नाईकवाडे, अमोल भिलारे, श्रीमती सुनंदा अतुल शिंदे, लहू नाईकवाडे, श्रीराम नाईक आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच प्रतिनिधिक स्वरूपात माता पालक व पुरुष पालकांचेही शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. शाळेत राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती शिक्षक सुग्रीव तांदळे व उद्धव घोडके यांनी पालकांना दिली. प्रस्ताविकातून ज्येष्ठ शिक्षक सुभाष काकड यांनी विद्यार्थ्यांची शिस्त, अभ्यासातील प्रगती, शालेय कामगिरी तसेच शाळेतील काही उणिवा यांची सविस्तर माहिती मांडली. शाळेच्या प्रगतीसाठी पालक व शिक्षकांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालक आणि शिक्षक यांच्यात विविध विषयांवर थेट संवाद झाला. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका श्रीमती पद्मजा हंम्पे यांनी शाळेच्या विकासासाठी पालकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चौसाळा ही विविध उपक्रमांमुळे नेहमीच चर्चेत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. शाळेतील भौतिक सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता असून पालकांनी शाळेसाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मेळाव्यास इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिकविणारे सर्व वर्गशिक्षक, विषय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. पालक-शिक्षक संवादातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला अधिक चालना मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

COMMENTS