जामखेड : खर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेच्या जीर्ण वर्गखोल्यांचे निर्लेखन करून त्या पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, नवीन वर्

जामखेड : खर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेच्या जीर्ण वर्गखोल्यांचे निर्लेखन करून त्या पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाला अद्याप लेखी मंजुरी नसतानाच जुन्या खोल्या पाडण्याची कार्यवाही सुरू झाल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
खर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेतील जीर्ण वर्गखोल्यांच्या निर्लेखनाचे आदेश ९ एप्रिल २०२५ रोजी देण्यात आले आहेत. नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम होण्यापूर्वीच जुन्या खोल्या पाडण्यात आल्यास विद्यार्थ्यांच्या अध्यापनाची मोठी अडचण निर्माण होणार आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था न करता शाळेच्या खोल्या पाडू नयेत, अशी मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे.
या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी बहुतांश गरीब व सामान्य कुटुंबातील आहेत. जुन्या इमारतीचे निर्लेखन करण्यापूर्वी नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाला मंजुरी देऊन प्रत्यक्ष बांधकाम सुरू करावे. त्यानंतरच जुन्या इमारतीच्या निर्लेखनाची कार्यवाही करावी, अशी भूमिका पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी घेतली आहे.
याबाबत संबंधितांनी जामखेडचे गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली. ‘आधी नवीन चार वर्गखोल्यांना मंजुरी द्या, बांधकाम सुरू करा आणि त्यानंतरच जुन्या वर्गखोल्यांचे निर्लेखन करा,’ अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाला तोंडी मंजुरी असल्याचे सांगितले जात असताना जुन्या वर्गखोल्या पाडण्याचे लेखी आदेश देण्यात आल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीबाबत पालक व ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेऊन प्रशासनाने या प्रकरणी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

COMMENTS