Homeताज्या बातम्या

मद्यधुंद डंपरचालकाने वीजखांब उखडवले; ५ किमी अंतरातील वाहिन्यांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

शेवगाव - अमरापूर-शेवगाव आणि अमरापूर-पाथर्डी मार्गावर मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने डंपर चालविणाऱ्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे महावितरणच्या वीज व

देगलूर उपजिल्हा रुग्णालयात ८९.७० लाखांच्या अपहाराचा पर्दाफाश; वैद्यकीय अधीक्षकांसह ५ जणांवर गुन्हा
उघड्या चेंबरचा सापळा; महापालिकेच्या १०० दिवसांच्या आराखड्यावर प्रश्नचिन्ह! मान्सून पूर्व नालेसफाईची कामे अर्धवट झाल्याचा आरोप
पाटेगाव सोसायटीच्या नवीन इमारतीचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन; सहकार मजबूत करण्याचे आवाहन

शेवगाव – अमरापूर-शेवगाव आणि अमरापूर-पाथर्डी मार्गावर मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने डंपर चालविणाऱ्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत महावितरणचे अनेक वीज खांब उखडून रस्त्यावर कोसळले. वीजवाहिन्या तुटल्याने संपूर्ण अमरापूर गावाचा वीजपुरवठा खंडित झाला असून, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अमरापूर-शेवगाव मार्गावरील एका खडी मिश्रण प्रकल्पावर साहित्य खाली केल्यानंतर हायवा डंपर पाथर्डीच्या दिशेने निघाला. डंपरचा मागील हायड्रॉलिक हौदा (डाला) खाली न करताच चालकाने वाहन पुढे नेले. या वेळी रस्त्यावरील मुख्य वीजवाहिन्यांमध्ये उंचावलेला हौदा अडकला. चालकाच्या हे लक्षात न आल्याने डंपर पुढे जात राहिला. त्यामुळे वीजवाहिन्यांवर ताण येऊन अमरापूर-शेवगाव मार्गावरील सुमारे तीन किलोमीटर आणि अमरापूर-पाथर्डी मार्गावरील सुमारे दोन किलोमीटर अंतरातील अनेक वीज खांब ओढले जाऊन उखडले गेले. काही खांब तुटून थेट रस्त्यावर कोसळले. वीजवाहिन्या ताणल्या गेल्याने मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडाल्या. काही धान्य गिरण्यांचे वीज मीटरही भिंतीवरून उखडून बाहेर आले. वीज खांब कोसळताना झालेल्या मोठ्या आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. भूकंप झाला की काय, अशी भीती वाटल्याने अनेक नागरिक घराबाहेर आले. दरम्यान, या गंभीर प्रकारास कारणीभूत ठरलेल्या डंपरचालकाविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच रात्रीच्या वेळी मद्यधुंद व ओव्हरलोड अवजड वाहनांवर प्रभावी नियंत्रण ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेप्रकरणी महावितरण आणि पोलिस प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे अमरापूरकरांचे लक्ष लागले आहे.

महावितरणचे मोठे नुकसान या घटनेमुळे महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेचे मोठे नुकसान झाले असून, अमरापूर गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीज खांब आणि वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

COMMENTS