तेहरान : अमेरिकेने पुन्हा युद्ध छेडल्यानंतर इराणने होमुर्झची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला. यानंतर अमेरिकेने इराणवर हल्ला करत पुन्हा युद्
तेहरान : अमेरिकेने पुन्हा युद्ध छेडल्यानंतर इराणने होमुर्झची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला. यानंतर अमेरिकेने इराणवर हल्ला करत पुन्हा युद्ध छेडले आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांनंतर, इराणने मध्य पूर्व भागात प्रत्युत्तरादाखल कारवाई सुरू केली आहे. रविवारी इराणने जॉर्डन, कुवेत, बहरीन, कतार, संयुक्त अरब अमिराती, ओमान या 6 देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ले केल्यामुळे युद्ध पुन्हा पेटतांना दिसून येत आहे. तत्पूर्वी, अमेरिकेने इराणच्या सुमारे 140 लष्करी ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले होते.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीबाबत कठोर भूमिका घेतली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) पुढील आदेश मिळेपर्यंत होर्मुझ सामुद्रधुनी बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला असून, अमेरिका या प्रदेशातील हस्तक्षेप थांबवत नाही तोपर्यंत हा निर्णय कायम राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या घोषणेमुळे जागतिक व्यापार, ऊर्जा पुरवठा आणि प्रादेशिक सुरक्षेबाबत नव्या चिंतेला तोंड फुटले आहे. आयआरजीसीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, परकीय शक्तींच्या हस्तक्षेपामुळे या भागातील सुरक्षा परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनीतून कोणत्याही व्यापारी किंवा इतर जहाजाला मार्गक्रमण करण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. परिस्थितीत बदल होईपर्यंत हा निर्बंध कायम राहील, असेही निवेदनात नमूद आहे. इराणने यासोबतच अमेरिका आणि तिच्या सहयोगी देशांना इशाराही दिला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्याचा आधार घेत इराणविरुद्ध कोणतीही अतिरिक्त लष्करी कारवाई करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला कठोर आणि तातडीने प्रत्युत्तर दिले जाईल, असा स्पष्ट इशारा आयआरजीसीने दिला आहे. इराणविरुद्ध आक्रमक भूमिका घेणार्या शक्तींना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असेही निवेदनात म्हटले आहे. इराणने पुढे असा आरोप केला की, सध्याची परिस्थिती निर्माण होण्यास अमेरिका आणि तिच्या मित्रदेशांची धोरणे कारणीभूत आहेत. या परिस्थितीचा वापर करून इराणवर आणखी हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यास केवळ त्या कारवाईलाच नव्हे, तर या प्रदेशातील संबंधित लष्करी तळांनाही लक्ष्य केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
होर्मुझ बंद होताच अमेरिकेचे इराणवर तिसर्यांदा हल्ले
होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याची घोषणा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने केल्यानंतर काही तासांतच अमेरिकेने इराणमधील अनेक लष्करी ठिकाणांवर हल्ले केल्याचे वृत्त समोर आले आहे. या नव्या घडामोडींमुळे पश्चिम आशियातील तणाव पुन्हा तीव्र झाला असून, दोन्ही देशांमधील संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझ सामुद्रधुनीलगत असलेल्या बंदर अब्बास आणि सीरिक या भागांत जोरदार स्फोट झाले. या स्फोटांनंतर अमेरिकेने लक्ष्यित लष्करी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
ओमान किनारपट्टीवर हल्ला, 10 भारतीय खलाशांची सुटका
ओमानच्या किनारपट्टीवर ’जीएफएस गॅलेक्सी’या मालवाहू जहाजावर झालेल्या भीषण हल्ल्याचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या जहाजावर 11 भारतीय खलाशी होते, ज्यांपैकी 10 जणांना वाचवण्यात आलं असून एक जण अद्याप बेपत्ता असल्याचे सरकारने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, मस्कतमधील भारतीय दूतावास शोध आणि बचावकार्यासाठी ओमानच्या अधिकार्यांशी समन्वय साधत असल्याचेही मंत्रालयाने पुढे स्पष्ट केले.

COMMENTS