नवी दिल्ली : देशात नळाद्वारे नैसर्गिक वायूच्या (PNG) वापराला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन उपाययोजना राबविण्यात येत असून, १ जूनपासून घरग

नवी दिल्ली : देशात नळाद्वारे नैसर्गिक वायूच्या (PNG) वापराला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन उपाययोजना राबविण्यात येत असून, १ जूनपासून घरगुती गॅस वापराबाबत काही महत्त्वाचे बदल लागू होण्याची शक्यता आहे. या नवीन बदलानुसार ज्या कुटुंबांकडे नळाद्वारे नैसर्गिक वायूची (पाईप गॅस) सुविधा उपलब्ध आहे, त्यांना घरगुती द्रवीभूत पेट्रोलियम गॅस (LPG Cylinder) कनेक्शन कायम ठेवण्यावर निर्बंध येऊ शकतात.
सरकारने गेल्या काही वर्षांत स्वयंपाकासाठी पाईप गॅसचा वापर वाढविण्याचा मोठा प्रयत्न सुरू केला आहे. देशभरात या सुविधेच्या लाखो नवीन जोडण्या (connections) देण्यात आल्या असल्या, तरी एलपीजी सिलेंडरच्या वापरात अपेक्षेप्रमाणे घट झालेली नाही. अनेक कुटुंबांनी नळाद्वारे नैसर्गिक वायूची सुविधा घेतल्यानंतरही घरगुती गॅस सिलेंडरचे कनेक्शन कायम ठेवल्याचे निदर्शनास आले आहे.
यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर, साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी “एक कुटुंब – एक गॅस जोडणी” या तत्त्वावर भर दिला जात आहे. नवीन व्यवस्थेनुसार एकाच पत्त्यावर पाईप गॅस आणि घरगुती गॅस सिलेंडर अशा दोन्ही सुविधा एकाच वेळी ठेवण्यावर मर्यादा घालण्याची तयारी सुरू आहे.
अधिकृत माहितीनुसार, ज्या घरांमध्ये पाईप गॅसची सुविधा उपलब्ध करून ती कार्यान्वित करण्यात आली आहे, अशा कुटुंबांना ठराविक कालावधीत घरगुती गॅस सिलेंडरचे कनेक्शन बंद करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. पाईप गॅस कनेक्शन मिळाल्यानंतर सुमारे ३० दिवसांच्या आत गॅस सिलेंडरचे कनेक्शन परत करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
यासाठी गॅस वितरण कंपन्या आणि तेल विपणन संस्थांचे संगणकीकृत अभिलेख (Data) एकत्रित केले जात आहेत. त्यामुळे एकाच कुटुंबाकडे दोन्ही प्रकारच्या जोडण्या असल्यास त्याची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. अशा परिस्थितीत संबंधित ग्राहकांना नवीन सिलेंडर बुक करण्यावर निर्बंध येऊ शकतात. मात्र, ज्या भागांत अद्याप पाईप गॅसची सुविधा पोहोचलेली नाही, तेथील नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडरची जोडणी पूर्ववत उपलब्ध राहणार आहे. तसेच विशेष परिस्थितीत बंद केलेली जोडणी पुन्हा सुरू करण्याची तरतूदही ठेवण्यात आली आहे.

COMMENTS