नांदेड : नांदेड शहरातील जबरी चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी विमानतळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत अवघ्या 24

नांदेड : नांदेड शहरातील जबरी चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी विमानतळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत अवघ्या 24 तासांत जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. एलआयसी कार्यालयाच्या पाठीमागील परिसरात दगडाने मारहाण करून दोन नागरिकांचे मोबाईल हिसकावून पळ काढणार्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेले दोन्ही मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. या जलद कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 जुलै 2026 रोजी रात्री फिर्यादी हे आपल्या मोटारसायकलवरून घरी जात असताना महाराणा प्रताप चौक परिसरातील एलआयसी कार्यालयाच्या पाठीमागे दबा धरून बसलेल्या तीन अज्ञात तरुणांनी त्यांना अडवले. आरोपींनी दगडाने मारहाण करून त्यांच्याजवळील सॅमसंग ॠरश्ररुू ड24 हा महागडा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. याच वेळी आरोपींनी परिसरातील आणखी एका नागरिकालाही लक्ष्य करत त्याच्याकडील रेडमी कंपनीचा मोबाईल बळजबरीने लुटून घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पीडिताच्या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 309 (6) व 3(5) अंतर्गत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजंने यांनी तातडीने तपासाच्या सूचना दिल्या.
त्याअनुषंगाने विमानतळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रामदास शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड तसेच गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज, गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि स्थानिक सुगाव्याच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान बालाजी नगर, राजीव गांधी शाळेमागील परिसरात सापळा रचून प्रतिक हरीष सोनटक्के (22), राहुल अशोकराव थोरात (23) आणि प्रशिक देवानंद श्रावणे (19) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून 8 हजार रुपये किमतीचा सॅमसंग ॠरश्ररुू ड24 आणि 6 हजार रुपये किमतीचा रेडमी टचस्क्रीन मोबाईल असा एकूण 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींनी यापूर्वीही अशाच प्रकारचे जबरी चोरी किंवा लुटमारीचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड करत आहेत. त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही पडताळणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या यशस्वी कारवाईमुळे विमानतळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे कौतुक होत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच नागरिकांनी रात्रीच्या वेळी निर्जन भागात जाताना सतर्क राहावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

COMMENTS