Homeताज्या बातम्या

दिल्लीत अग्नीतांडव; २१ जणांचा मृत्यू, ३७ जणांना वाचवण्यात यश

मृतांमध्ये परदेशी व्यक्तींचा समावेश नवी दिल्ली : दिल्लीतील मालवीय नगर परिसरात बुधवारी सकाळी उपहारगृह (रेस्टॉरंट) आणि निवास व्यवस्था असले

देशात १ जूनपासून ‘एक कुटुंब, एक कनेक्शन’; एलपीजी गॅसचे नियम बदलणार!
देशात २४ तास कार्यरत न्यायव्यवस्थेची गरज : सरन्यायाधीश सूर्यकांत
सीएनजी पुन्हा २ रुपयांनी महागला; ११ दिवसांत चौथ्या दरवाढीमुळे वाहनचालकांना फटका

मृतांमध्ये परदेशी व्यक्तींचा समावेश

नवी दिल्ली : दिल्लीतील मालवीय नगर परिसरात बुधवारी सकाळी उपहारगृह (रेस्टॉरंट) आणि निवास व्यवस्था असलेल्या एका सहा मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत किमान २१ जणांचा मृत्यू झाला, तर ३७ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. मृतांमध्ये परदेशी नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये मध्य आशिया तसेच आफ्रिकेतील काही परदेशी नागरिक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. अनेक जण गंभीररीत्या भाजल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ८.५० वाजता तळमजल्यावरील “लेमन ग्रीन” या उपहारगृहात आग लागल्याची माहिती मिळाली. काही क्षणांतच आगीने वरच्या मजल्यांवरील “फ्लोरिश स्टे” या निवास व्यवस्थेला वेढा घातला. इमारतीतील धूर आणि ज्वालांमुळे अनेक जण अडकून पडले. घटनेनंतर जीव वाचवण्यासाठी काहींनी तिसऱ्या व चौथ्या मजल्यावरून खाली उड्या मारल्या. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत खाली गाद्या अंथरून मदतकार्य सुरू केले. एका महिलेने दोरीच्या साहाय्याने खाली उतरण्याचा प्रयत्न केला; मात्र हात सुटल्याने ती खाली पडली. सुदैवाने गाद्यांवर पडल्यामुळे तिचा जीव वाचला.

अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावमोहीम सुरू केली. तळघरातून सहा जणांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर वरच्या मजल्यांवर अडकलेल्या लोकांचीही सुटका करण्यात आली. एकूण ३७ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. साकेत येथील एका प्रमुख रुग्णालयात ३९ जखमींना दाखल करण्यात आले. त्यापैकी १८ जणांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. अनेक जण अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असून काहींना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले आहे. तसेच दिल्लीतील दुसऱ्या प्रमुख वैद्यकीय संस्थेतही अनेक जखमींवर उपचार सुरू आहेत.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार विद्युत यंत्रणेद्वारे नियंत्रित होते. आग लागल्यानंतर वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रवेशद्वार बंद झाले आणि अनेकांचा बाहेर पडण्याचा मार्ग अडकला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी काचा फोडून आत अडकलेल्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. ही इमारत प्रेस एन्क्लेव्ह मार्गावर असून परिसरात मोठी रुग्णालये आहेत. उपचारासाठी बाहेरून आलेल्या रुग्णांचे नातेवाईक या निवासस्थानी राहत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आगीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये विविध राज्यांतील तसेच परदेशातील नागरिकांचाही समावेश असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून घटनास्थळी न्यायवैद्यक तज्ज्ञांचे (Forensic Experts) पथक तपास करत आहे. सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, तसेच अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत होती का, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. गेल्या काही महिन्यांत दिल्लीत आग लागण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, या दुर्घटनेमुळे शहरी भागातील अग्निसुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

COMMENTS