Homeताज्या बातम्या

श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावरील झाडांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष; वृक्षप्रेमींकडून सार्वजनिक बांधकामकडे संवर्धनाची मागणी

बेलापूर - श्रीरामपूर-बेलापूर रस्त्याच्या दुभाजकातील तसेच रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांच्या संगोपनाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ह

अल्पसंख्याक संरक्षण कायद्याच्या मागणीला मोठे यश; उपमुख्यमंत्री सुमित्राताई अजित पवार यांच्याशी सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन स्थगित
लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंनी वंचितांच्या व्यथा मांडल्या : आमदार आशुतोष काळे
‘महाराष्ट्र शासन’ अन् ‘सेंट्रल गव्हर्नमेंट’च्या पाट्या लावलेल्या वाहनांची नांदेडमध्ये वाढ; गैरवापराची चौकशी होणार का?

बेलापूर – श्रीरामपूर-बेलापूर रस्त्याच्या दुभाजकातील तसेच रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांच्या संगोपनाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बेलापूरमधील वृक्षप्रेमींकडून करण्यात आला आहे. यापूर्वी उन्हाळ्यात सत्यमेव जयते ग्रुप, वृक्षप्रेमी नागरिक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने अनेक झाडांना पाणी देऊन जगविण्यात आले होते. आता नव्याने लावलेल्या झाडांचीही नियमित देखभाल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. श्रीरामपूर-बेलापूर मार्ग चौपदरी झाल्यानंतर दुभाजकात तसेच रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली. मात्र, या झाडांच्या देखभाल व निगराणीबाबत पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे वृक्षप्रेमींचे म्हणणे आहे. निधीअभावी देखभाल होत नसल्याचे कारण दिले जात असल्याने, देखभालीसाठी निधीची व्यवस्था नसेल तर वृक्षलागवड करून त्यावर झालेला खर्च वाया जाण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले. उन्हाळ्यात पाण्याअभावी झाडे सुकू लागल्यानंतर सत्यमेव जयते ग्रुपने पुढाकार घेतला. सदस्य तसेच बेलापूरमधील वृक्षप्रेमी नागरिक व संस्थांकडून लोकवर्गणी जमा करून ग्रामपंचायतीच्या टँकरचे भाडे भरून झाडांना पाणी देण्यात आले. श्रीरामपूर नगरपालिकेनेही वेस ते गायकवाड वस्ती या परिसरातील झाडांना पाणी देण्याची व्यवस्था केल्याने अनेक झाडे वाचविण्यात आली. दरम्यान, रस्त्याच्या दुतर्फा पुन्हा वड, पिंपळ आदी झाडांची लागवड करण्यात आली आहे. मात्र, या झाडांना संरक्षण व्यवस्था तसेच नियमित पाणी देण्याची सुविधा अद्याप पुरेशी नसल्याचे वृक्षप्रेमींचे म्हणणे आहे. दुभाजकात वाढलेले गवत काढणे आणि झाडांची नियमित निगा राखणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. रस्त्यावरील वृक्षलागवड केवळ कागदावर न राहता त्यांचे संगोपनही तितक्याच गांभीर्याने केले जावे. यापुढे दुभाजकातील आणि रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांची देखभाल न झाल्यास त्यासाठी झालेला खर्च आणि त्यानंतरची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी सत्यमेव जयते ग्रुपसह बेलापूरमधील वृक्षप्रेमींनी केली आहे.

COMMENTS