संगमनेर : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार तसेच तिच्या आजीचे अपहरण करून खून केल्याच्या प्रकरणातील आरोपींवर कठ
संगमनेर : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार तसेच तिच्या आजीचे अपहरण करून खून केल्याच्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संगमनेर तालुका कुंभार समाज संघटनेने केली आहे. याबाबत संघटनेच्या वतीने संगमनेर विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरोपींकडून प्रकरण मागे घेण्यासाठी तीन लाख रुपये देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे. मात्र, पीडितेच्या आजीने ही रक्कम नाकारल्यानंतर तिचे अपहरण करून खून करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील तसेच बारा बलुतेदार समाजातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. ग्रामीण भागात काही गुंडांकडून सर्वसामान्य नागरिकांना त्रास दिला जात असून, त्यांच्या कथित राजकीय पाठबळामुळे नागरिक तक्रार करण्यास धजावत नाहीत, असा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास तातडीने पूर्ण करून सर्व संबंधित आरोपींना अटक करावी, तसेच आरोपींना कथित राजकीय पाठबळ देणाऱ्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. आठ दिवसांच्या आत संबंधित आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ, जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांना पाठविण्यात आल्या आहेत. निवेदनावर संतोष नामदेव जोर्वेकर, पंकज संपत जोर्वेकर, मच्छिंद्र जोर्वेकर, बाळासाहेब जोर्वेकर, दत्तू जोर्वेकर, शंभू जोर्वेकर, भारत जोर्वेकर, मानवेंद्र जोर्वेकर आदींच्या सह्या आहेत.

COMMENTS