देगलूर: शहरातील लगतच्या लेंडी नदीवरील पातळगंगा परिसरातील चौकोन डोहातील पाणी सध्या गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याचे चित्र समोर आले आहे. डोहात
देगलूर: शहरातील लगतच्या लेंडी नदीवरील पातळगंगा परिसरातील चौकोन डोहातील पाणी सध्या गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याचे चित्र समोर आले आहे. डोहातील पाण्याचा रंग कळपट झाला असून त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दूषित पाण्यामुळे त्वचारोग, ॲलर्जी तसेच विविध संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने पाणी पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत नागरिकांनी व जलतरणपटूंनी स्विमिंग टाळावे, असे आवाहन प्रसिद्ध सर्जन डॉ. विनायक मुंडे आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जनार्धन भुमे यांनी केले आहे.
देगलूर शहर व परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यदायी जलतरणस्थळ म्हणून ओळखल्या जाणार्या पातळगंगा परिसरातील चौकोन डोहाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अनेक वर्षांपासून येथे जलतरणाचा सराव करणार्या नागरिकांनी पाण्याच्या रंगात मोठा बदल झाल्याचे आणि असह्य दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. या डोहात नियमित पोहणार्या अनेक जलतरणपटूंना अंगावर खाज येणे, त्वचेवर पुरळ उठणे, ॲलर्जी, सर्दी तसेच इतर संसर्गजन्य त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून तातडीने वैज्ञानिक तपासणीची गरज व्यक्त केली जात आहे.
गेल्या चार दशकांपासून या डोहात नियमित जलतरण करणारे डॉ. विनायक मुंडे आणि डॉ. जनार्धन भुमे यांनी दूषित पाण्यात पोहणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते, असा इशारा दिला आहे. अशा पाण्यातील जिवाणू, विषाणू आणि इतर प्रदूषकांमुळे त्वचारोग, डोळ्यांचे संसर्ग, ॲलर्जी तसेच विविध संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता पूर्ववत होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत जलतरण करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आचेगाव, ढोसणी, करेमलकापूर आणि बळेगाव येथील सांडपाणी थेट लेंडी नदीपात्रात सोडले जात असल्यानेच नदीचे पाणी दूषित झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या प्रकाराची तातडीने शासकीय चौकशी करून प्रदूषणाचे मूळ कारण शोधावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जलतरणपटू आणि नागरिकांकडून होत आहे.
सार्वजनिक आरोग्यावरही संकटाचे सावट
नदीपात्रात सांडपाणी मिसळण्याचे प्रकार कायम राहिल्यास केवळ जलतरणपटूंच्याच नव्हे, तर देगलूर शहराच्या सार्वजनिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतात. विशेषतः पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता अधिक असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ, आरोग्य विभाग, संबंधित ग्रामपंचायती आणि प्रशासनाने संयुक्तपणे पाण्याची गुणवत्ता तपासून प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात. तसेच नदीपात्रात सांडपाणी सोडण्याचे प्रकार कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून जोर धरत आहे.

COMMENTS