Homeताज्या बातम्या

मध्यम पावसातच नांदेडचा विकास बुडाला! श्रीनगर-शिवाजीनगर-भाग्यनगर जलमय; कोट्यवधींच्या विकासकामांची पोलखोल

नांदेड: शहरात रविवारी रात्री झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसानेच महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजनाचा आणि कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा फ

सौ. के. एस. के. महाविद्यालयात ‘पाऊस गाणी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या बहारदार सादरीकरणाने सभागृह दुमदुमले
दुबई-मुंबई विमानाचे राजकोटमध्ये इमर्जन्सी लँडिंग; कार्गो भागात धूर निघाल्याने धावपट्टीवर खळबळ
विद्यार्थी आंदोलनात लाठीचार्जचा आदेश कोणी दिला? खासदार राहुल गांधींचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्राद्वारे सवाल

नांदेड: शहरात रविवारी रात्री झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसानेच महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजनाचा आणि कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा फोलपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा, शैक्षणिक आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा समजला जाणारा श्रीनगर-शिवाजीनगर-भाग्यनगर-आनंदनगर परिसर अक्षरशः जलमय झाला. अवघ्या काही तासांच्या पावसाने रस्ते तळ्यांचे रूप धारण करताच वाहतुकीचा खोळंबा झाला, अनेक दुकाने पाण्याखाली गेली आणि व्यापार्‍यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.

विशेष म्हणजे हा मुसळधार नव्हे, तर मध्यम स्वरूपाचा पाऊस होता. तरीही शहरातील प्रमुख रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना अक्षरशः जलप्रलयाचा अनुभव आला. यामुळे कोट्यवधी रुपयांच्या रस्ते व विकासकामांवर खर्च झालेला निधी नेमका गेला कुठे, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

या परिसरात रस्त्यांची उंची वारंवार वाढविण्यात आली; मात्र त्याच प्रमाणात जलनिस्सारण व्यवस्था विकसित करण्यात आली नाही. परिणामी अनेक दुकाने रस्त्यापेक्षा खाली गेली असून रस्त्यावर साचलेले पाणी थेट दुकानांमध्ये घुसत आहे. अनेक व्यापार्‍यांचा माल भिजून खराब झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. काही व्यापार्‍यांनी स्वतःच मोटारी, बादल्या आणि पंपांच्या साहाय्याने दुकानातील पाणी बाहेर काढण्याची धावपळ केली.

नांदेडच्या नागरी नियोजनातील गंभीर त्रुटी अधोरेखित करणाऱ्या या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे दावे केले जात असताना मध्यम पावसातच शहर जलमय होत असेल, तर या कामांच्या दर्जाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच संबंधित ठेकेदार, अभियंते आणि जबाबदार अधिकार्‍यांवर कडक कारवाई करून सक्षम जलनिस्सारण व्यवस्था उभारावी, अशी मागणी संपूर्ण शहरातून होत आहे.

COMMENTS