नवी दिल्ली : देशातील मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या विशेष गहन पुनरावलोकन अर्थात एसआयआर अंतर्गत प्रक्रि

नवी दिल्ली : देशातील मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या विशेष गहन पुनरावलोकन अर्थात एसआयआर अंतर्गत प्रक्रियेनंतर मोठ्या प्रमाणात मतदारसंख्येत घट झाल्याचे चित्र समोर आले आहे. या प्रक्रियेनंतर 9 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमधील एकत्रितपणे सुमारे 6 कोटी 8 लाख मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे या राज्यांतील एकूण मतदारसंख्या 51 कोटींवरून कमी होऊन 44 कोटी 92 लाखांवर आली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर या पुनरावलोकन प्रक्रियेचा दुसरा टप्पा पूर्ण झाला. या टप्प्यात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, राजस्थान, छत्तीसगड, केरळ, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यांसह पुदुचेरी, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होता. बिहारमध्ये ही प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण करण्यात आली होती. निवडणूक अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेची घोषणा करण्यात आली तेव्हा संबंधित राज्यांतील एकूण मतदारसंख्या सुमारे 51 कोटी होती. मात्र, तपासणी आणि पडताळणीदरम्यान अनेक नावे अपात्र ठरल्याने ती वगळण्यात आली आणि अंतिम संख्या 44 कोटी 92 लाखांपर्यंत खाली आली. देशातील सुमारे 99 कोटी मतदारांपैकी जवळपास 60 कोटी मतदार या मोहिमेत समाविष्ट झाले होते. उर्वरित सुमारे 40 कोटी मतदारांचा समावेश पुढील टप्प्यात करण्यात येणार असून त्यासाठी 17 राज्ये आणि पाच केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. संबंधित राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर या कामाला अधिक वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यानुसार घट पाहता, गुजरातमध्ये सर्वाधिक 13.40 टक्के घट नोंदवली गेली आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेशमध्ये 13.24 टक्के घट झाली आहे. छत्तीसगडमध्ये 11.77 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 11.61 टक्के, तामिळनाडूमध्ये 11.55 टक्के, गोव्यात 10.76 टक्के, पुदुचेरीमध्ये 7.57 टक्के, मध्य प्रदेशमध्ये 5.97 टक्के, बिहारमध्ये 5.95 टक्के, राजस्थानमध्ये 5.74 टक्के आणि केरळमध्ये 3.22 टक्के घट नोंदवली गेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये या मोहिमेपूर्वी 15 कोटी 44 लाख मतदार नोंदले गेले होते. आता ही संख्या कमी होऊन 13 कोटी 40 लाखांवर आली आहे. लखनऊ येथे सर्वाधिक 22.89 टक्के घट झाली असून पुरुषांसोबतच महिला मतदारसंख्येतही घट झाल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, प्रारूप यादीच्या तुलनेत अंतिम यादीत 84 लाख 28 हजार मतदारांची वाढ झाल्याची नोंदही करण्यात आली आहे. लखनऊ, प्रयागराज, कानपूर, आग्रा आणि गाझियाबाद या प्रमुख शहरांमध्ये मतदार यादीत मोठे बदल दिसून आले आहेत. साहिबाबाद, नोएडा, लखनऊ उत्तर, आग्रा छावणी आणि इलाहाबाद उत्तर या विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक घट झाली आहे.
पश्चिम बंगालमध्ये 90 लाखांहून अधिक नावे वगळली
पश्चिम बंगालमध्येही या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात नावे वगळण्यात आली आहेत. अंतिम पडताळणीनंतर सुमारे 90 लाखांहून अधिक मतदारांची नावे यादीतून कमी करण्यात आली. निवडणूक यंत्रणेने स्पष्ट केले आहे की, ही कारवाई मतदार यादीतील त्रुटी दूर करून ती अधिक अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी करण्यात आली आहे. आगामी टप्प्यांमध्येही ही प्रक्रिया सुरू राहणार असून देशभरातील मतदार नोंदणी व्यवस्थेत मोठे बदल दिसून येण्याची शक्यता आहे.

COMMENTS