बीड: जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे आणि महसूल प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे बीड तालुक्यातील नाळवंडी-खांडे पारगाव या द

बीड: जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे आणि महसूल प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे बीड तालुक्यातील नाळवंडी-खांडे पारगाव या दोन गावांना जोडणारा महत्त्वाचा शेतरस्ता अखेर सर्वांसाठी खुला झाला आहे. स्वातंत्र्यानंतर तब्बल पन्नास वर्षांहून अधिक काळ न्यायालयीन प्रक्रिया, स्थानिक वाद आणि काही जमीनधारकांच्या आक्षेपांमुळे रखडलेला हा प्रश्न अखेर मार्गी लागल्याने दोन्ही गावांतील शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हाधिकार्यांच्या सूचनेनुसार उपजिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या समन्वयातून बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी या प्रकरणात विशेष रस घेतला. त्यांनी तीन वेळा प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत संबंधित जमीनधारक, शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. महसूल अभिलेख, गावनकाशे आणि न्यायालयीन बाबींचा सखोल अभ्यास करून सर्व संबंधितांना विश्वासात घेण्यात आले. मंडळ अधिकारी, तलाठी आणि महसूल कर्मचार्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, पंचनामे आणि समन्वयाची जबाबदारी पार पाडत या कामात महत्त्वाची भूमिका बजावली.
नाळवंडी आणि खांडे पारगावमधील शेतकर्यांसाठी हा रस्ता जीवनवाहिनी मानला जात होता. अनेक शेतकरी शेतातच कायमस्वरूपी वास्तव्यास असल्याने शेतीमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णांची ने-आण आणि दैनंदिन व्यवहारांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा होता. रस्ता बंद असल्यामुळे नागरिकांना अनेक किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता. नाळवंडी हे परिसरातील प्रमुख गाव असून येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, बँका, शासकीय कार्यालये आणि मोठीबाजारपेठ आहे. त्यामुळे खांडे पारगावसह परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन नाळवंडीशी जोडलेले आहे.
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी कायद्याच्या चौकटीत सर्वांना न्याय मिळेल अशी भूमिका घेत सातत्याने समन्वय बैठका घेतल्या. यामुळे दीर्घकाळ न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेला प्रश्न अखेर सुटला. रस्ता सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व विशेष आभारपत्र दिले. यावेळी नाळवंडीचे सरपंच राजेंद्र राऊत यांच्यासह निलेश राऊत, महेंद्रकुमार म्हेत्रे, नारायण राऊत, अशोक जाधव, शंकर म्हेत्रे, शिवाजी राऊत, प्रताप जाधव तसेच दोन्ही गावांतील मोठ्या संख्येने शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. रस्ता खुला झाल्यामुळे आता शेतीमालाची वाहतूक सुलभ होणार असून ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानात मोठी सुधारणा अपेक्षित आहे.

COMMENTS