Homeताज्या बातम्या

पायी लाँग मार्चची २६ जूनला चैत्यभूमीवर सांगता; उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरवादी युवकांचे एकजुटीचे आवाहन

बीड: अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात असल्याचा आरोप करत त्याविरोधात बीड ते मुंबई असा भव्य पायी लाँग मार्च

सालेवडगावमध्ये कृषीदूतांचे उत्साहात स्वागत
सज्जन-दुर्जन असा भेद न करता माऊलींनी सर्वांवर कृपा केली; ह.भ.प. श्री राम महाराज काजळे यांचे प्रतिपादन
शहीद जवानांच्या वारसांना शेतजमीन हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

बीड: अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात असल्याचा आरोप करत त्याविरोधात बीड ते मुंबई असा भव्य पायी लाँग मार्च काढण्यात आला आहे. सामाजिक न्याय, संविधानिक हक्क आणि अनुसूचित जातींची एकता कायम राखण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मार्चची सांगता २६ जून रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे होणार आहे.

१० जून रोजी बीड येथून सुरू झालेल्या या पायी मार्चमध्ये राज्यभरातील आंबेडकरवादी कार्यकर्ते, युवक-युवती, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता हजारो कार्यकर्ते संविधान आणि सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने पायी मार्गक्रमण करत आहेत. अनुसूचित जातींमध्ये फूट पाडणारे कोणतेही उपवर्गीकरण स्वीकारले जाणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केली आहे.

आंबेडकरवादी युवक किरण वाघमारे, अॅड. राजेश शिंदे, प्रवीण टाकणखार आणि रजनिकांत वाघमारे यांनी संयुक्त निवेदनाद्वारे सांगितले की, हा लढा केवळ आरक्षणाचा नसून सामाजिक एकता, संविधानिक अधिकार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे संरक्षण करण्यासाठी आहे. मुंबईतील चैत्यभूमीवर २६ जून रोजी होणार्‍या समारोप कार्यक्रमास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली एकजूट दाखवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हा मार्च अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधातील जनभावना सरकारपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम ठरणार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. संविधान, समता आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळ देण्यासाठी राज्यभरातील आंबेडकरवादी समाजाने चैत्यभूमीवरील सांगता कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही निवेदनातून करण्यात आले आहे.

COMMENTS