Homeताज्या बातम्या

कोयत्याने वार करून जबरी चोरी करणार्‍या टोळीला बीड एलसीबीने ठोकल्या बेड्या; इंदापूरमधून तीन आरोपी गजाआड

बीड: पाटोदा तालुक्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या जबरी चोरी व घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) यशस्वी छडा लावत तीन अट्ट

विना अटी सरसकट शेतकरी कर्जमाफीची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
नांदेड-हणेगाव बससेवेअभावी नागरिक त्रस्त; भीमशक्ती सामाजिक संघटनेचे बसस्थानक प्रमुखांना निवेदन
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथील धक्कादायक घटना

बीड: पाटोदा तालुक्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या जबरी चोरी व घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) यशस्वी छडा लावत तीन अट्टल आरोपींना अटक केली आहे. इंदापूर (जि. पुणे) येथून या आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेला कोयता जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जून २०२६ रोजी राजेंद्र अभिमान नागरे (वय ४१, रा. थेरला) हे मोटारसायकलवरून गावी जात असताना रोहतवाडी शिवारात तीन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. आरोपींनी थेट कोयत्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आणि त्यांच्याकडील मोबाईल फोन व रोख रक्कम लुटून फरार झाले होते. या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमी नागरे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

याच दिवशी आरोपींनी थेरला फाटा परिसरातील सिताबाई महादेव सोनवणे यांच्या घरात तसेच ‘संतकृपा’ हॉटेलमध्ये घरफोडी केली होती. या चोरीत टीव्ही, मोबाईल आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. या प्रकरणीही पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशी झाली कारवाई

दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व त्यांच्या पथकाकडून सुरू होता. सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण आणि तांत्रिक तपासादरम्यान पोलीस अंमलदार बाळू सानप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी इंदापूर येथे असल्याची खात्री पटली.

यानंतर एलसीबीच्या पथकाने तात्काळ इंदापूर येथे जाऊन माऊली नामदेव पवार (वय २६), मयूर ऊर्फ ओंकार नितीन भोसले (वय २२) आणि आदित्य ऊर्फ बाळा सिद्ध पवार (वय १९) यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला. अटक केलेल्या तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी पाटोदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक औदुंबर मस्के करीत आहेत.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

COMMENTS