बीड : बीड नगरपरिषद अंतर्गत दलित वस्ती सुधार योजनेतून प्रभाग क्रमांक २ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रस्ता व नाली विकासकामांना अ

बीड : बीड नगरपरिषद अंतर्गत दलित वस्ती सुधार योजनेतून प्रभाग क्रमांक २ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रस्ता व नाली विकासकामांना अद्याप सुरुवात न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या संदर्भात बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि संबंधित कंत्राटदार ‘सिताई एजन्सी’ यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनातील माहितीनुसार, जिजामाता चौक पॅराडाईज हॉस्पिटल ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हिना नगर परिसरातील रस्ता व नाली विकासासाठी ९९.९९ लाख रुपये मंजूर झाले आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील स्टेडियम रोड रस्ता व नाली कामासाठी १.९९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही दोन्ही महत्त्वाची कामे सिताई एजन्सीकडे सोपविण्यात आली आहेत. मात्र, मंजुरी मिळून सुमारे दीड महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.
पावसाळा तोंडावर आलेला असताना परिसरातील रस्त्यांची दुरवस्था आणि नाल्यांच्या समस्येमुळे पाणी साचून नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे. निधी असूनही कामाला विलंब का होत आहे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. नगरपरिषद प्रशासनाने कंत्राटदाराकडून तातडीने काम सुरू करून घ्यावे; अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रा. सनी विष्णू वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

COMMENTS