लातूर : जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून औसा तालुक्यातील गोंद्री गावात 9 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू उ
लातूर : जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून औसा तालुक्यातील गोंद्री गावात 9 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनही सतर्क झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा अधिक तीव्र झाला आहे. दुपारच्या वेळी तापमान 40 ते 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी वर्ग या उष्णतेला सर्वाधिक बळी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. सतत वाढणार्या तापमानामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ग्रामीण भागात दुपारच्या कडक उन्हात काम करणार्या लोकांवर याचा अधिक परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे. काही दिवसांपूर्वी औराद शहाजनी येथे 60 वर्षीय शेतकर्याचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. आता गोंद्री येथील बाळाच्या मृत्यूच्या संशयित घटनेमुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा दोनवर पोहोचला आहे. परिस्थिती लक्षात घेता आरोग्य विभागाने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक कामांशिवाय दुपारच्या वेळेत घराबाहेर पडू नये, पुरेसे पाणी प्यावे, हलके व सैल कपडे परिधान करावेत, तसेच लहान मुलांची आणि वृद्धांची विशेष काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.

COMMENTS