राहाता: तालुक्यातील लोणी खुर्द येथे महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष खासदार

राहाता: तालुक्यातील लोणी खुर्द येथे महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार, नामदार दिलीपराव वळसे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार निलेश लंके, चंद्रकांत दळवी, माजी आमदार सुधीर तांबे आणि संदीप वर्पे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रभावती जनार्दन घोगरे यांच्या ‘घोगरे पाटील वाडा’ या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
लोणी खुर्द परिसरात उत्साहाचे वातावरण, फटाक्यांची आतिषबाजी
या दिग्गज नेत्यांच्या आगमनाने घोगरे पाटील वाडा आणि संपूर्ण लोणी खुर्द परिसरात कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून फटाक्यांची आतिषबाजी करत सर्व मान्यवरांचे उत्साही वातावरणात स्वागत केले. विशेषतः शरद पवार यांच्या भेटीमुळे परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि युवकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली. या प्रसंगी शरद पवार यांनी स्व. चंद्रभानदादा घोगरे, स्व. शंकरनाना खर्डे, डॉ. अण्णासाहेब शिंदे तसेच संपूर्ण प्रवरा परिसराच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.
एकाच वाहनातून प्रवास; राजकीय वर्तुळात मोठे संकेत
या भेटीदरम्यान खासदार शरदचंद्र पवार, बाळासाहेब थोरात आणि प्रभावती घोगरे यांनी एकाच वाहनातून प्रवास केला. या प्रसंगामुळे सध्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले असून, प्रभावती घोगरे यांच्याविषयी वरिष्ठ नेत्यांचा स्नेह, विश्वास आणि त्यांना मिळत असलेले राजकीय मार्गदर्शन या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. मान्यवरांनी प्रभावती घोगरे यांना त्यांच्या पुढील सामाजिक, राजकीय आणि जनसेवेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य एकनाथ पाटील घोगरे, अरुण पाटील कडू, बाळासाहेब विखे, सुरेंद्र पाटील खर्डे, लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे, ज्येष्ठ नेते आबासाहेब आहेर आणि आप्पासाहेब घोगरे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सदिच्छा भेटीची सध्या संपूर्ण तालुक्यात आणि राजकीय-सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

COMMENTS