Homeकृषी

रानडुकरांचा हैदोस; कर्जत तालुक्यातील रवळगाव येथे डाळिंब बागेचे लाखोंचे नुकसान, वन विभागाकडे भरपाईची मागणी

कर्जत: तालुक्यातील रवळगाव परिसरात रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवाने शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. येथील एका शेतकऱ्याच्या काढणीस आलेल्या डाळिंब ब

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पंकजाताई मुंडे यांची सांत्वनपर भेट; कै. किसनराव मोहोळ यांना वाहिली श्रद्धांजली
नांदेडमधील कोचिंग क्लासेस सुरक्षित आहेत का? लखनऊ दुर्घटनेनंतर अभ्यासिका आणि शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
राज्यात लवकरच ८८ नवीन महसूल कार्यालये प्रस्तावित; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय, हरकती व सूचना मागविल्या

कर्जत: तालुक्यातील रवळगाव परिसरात रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवाने शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. येथील एका शेतकऱ्याच्या काढणीस आलेल्या डाळिंब बागेचे रानडुकरांनी लाखो रुपयांचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अचानक ओढवलेल्या संकटामुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडला असून, वन विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

चार वर्षांची मेहनत मातीत; ६ ते ७ लाखांचा फटका

रवळगाव येथील शेतकरी मनोहर चिमाजी रासकर यांनी चिंतामणी मंदिर शिवारात दीड एकर क्षेत्रावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डाळिंब बाग फुलवली होती. दुष्काळी भागात ठिबक सिंचनाच्या माध्यमातून चार वर्षांपूर्वी मोठ्या मेहनतीने त्यांनी ही बाग उभी केली. यंदा बागेला चांगला बहार आला होता आणि बाजारपेठेत डाळिंबाला चांगला भाव असल्याने मोठ्या उत्पन्नाची आशा निर्माण झाली होती.

मात्र, रानडुकरांच्या कळपाने या बागेत घुसून काढणीस आलेल्या फळांची आणि झाडांची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. यामध्ये बागेभोवती लावलेली संरक्षक जाळीही तोडण्यात आली आहे. या घटनेत अंदाजे एक ते दीड टन डाळिंबाचे नुकसान झाले असून, सुमारे ६ ते ७ लाख रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वन विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करावा आणि रानडुकरांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.

लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी

“अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कर्ज काढून ही डाळिंब बाग उभी केली होती. मेहनतीने वाढवलेल्या बागेला यंदा चांगला बहार आला होता, मात्र काढणीच्या तोंडावर रानडुकरांनी लाखो रुपयांचे नुकसान केले. वन विभागाने याचा पंचनामा करून तातडीने भरपाई द्यावी. तसेच आमदार रोहित पवार आणि विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या गंभीर समस्येकडे वैयक्तिक लक्ष द्यावे,” अशी आर्त हाक नुकसानग्रस्त शेतकरी मनोहर रासकर यांनी दिली आहे.

COMMENTS